मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच या पुस्तकाने राज्य आणि देशातील राजकारणात बॉम्ब टकाला आहे. पुस्तकातील दाव्यांनी, गौप्यस्फोटांनी वातावरण ढवळून निघाले आहे. आता या पुस्तकाच्या अनुषंगाने राऊतांनी अजून एक दावा केला आहे.
एकनाथ शिंदेंचा मला फोन
आम्ही कुठे म्हटले आम्ही नरकात गेलो. नरकात तुम्ही गेलात, अशी टीका त्यांनी केली. या शिंदेंचा संबंध काय? अटकेच्या आधी आदल्या दिवशी शिंदेंचा मला फोन होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असे एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही, असे संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट स्वत: संजय राऊतांनी आज केला.
काय म्हणाले संजय राऊत?
माझ्या अटकेआधी मी शहा यांना फोन केला होता, कारण ते गृहमंत्री होते. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या संवादाचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले, “मी स्वतः अमित शहा यांना रात्री ११ वाजता फोन केला. ते त्या वेळी कामात होते. चार-पाच मिनिटांनी त्यांनी मला परत फोन केला. मी त्यांना विचारले, माझ्या निकटवर्तीयांना आणि कुटुंबियाला त्रास दिला जात आहे, रेड टाकल्या जात आहेत, धमक्या दिल्या जात आहे. हे तुमच्या मंजुरीने होतेय का? जर मला अटक करायची असेल तर मी दिल्लीच्या घरी आहे. ही नौटंकी बंद करा.” असे राऊत म्हणाले. यावर अमित शहांनी मला यासंदर्भात काहीच माहित नाही, असे उत्तर दिले होते, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शाह यांच्यामुळे कटुता
अमित शाह यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली हे मी १०० टक्के सांगतो. आमचे भाजपचे संबंध चांगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत चांगले संबंध होते. पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेना नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. काही भाजप नेत्यांनी अमित शाह यांना सांगितलेसुद्धा तुम्ही असे करू नका…अरुण जेटली अमित शाह यांना म्हणाले होते, की महाराष्ट्रात शिवसेनेसोबत चांगले संबंध आहेत, तुम्ही असे करु नका, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा