मुंबई । Mumbai
राजकीय जाणकार आणि एग्झिट पोल्सना बुचकळ्यात पाडत हरियाणा निवडणुकीत निकाल भाजपाच्या बाजूने लागले. भाजपाने ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तर ज्यांना सत्तेचे दावेदार समजले जात होते, त्या काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हरियाणातील हा पराभव दुर्दैवी आहे. पण या पराभवामुळे आम्ही निराश झालेलो नाही, असेही राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण काँग्रेसची हरियाणात सत्ता कशी आली असती, याबाबतचे कारणही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे, त्यातून बरेच काही शिकता आले. कोणी कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ समजत नाही लोकसभेतला यश हे इंडिया आघाडीचे यश आहे, काँग्रेस पक्षाला अन्य राज्यातील निवडणुकीसाठी भूमिका घ्यावी लागेल. स्वबळावर लढायचे असेल, तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग अन्य पक्ष आपआपली भूमिका घेतील, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच, हरियाणाचा विजय फार मोठा महान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मत घेतली. जो जिंकतो सिकंदर अशी हिंदीमध्ये म्हण आहे. देवेंद्र फडणवीस हरियाणामध्ये गेले आणि विजय प्राप्त झाला असे काही होत नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिघांची महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व जागरुक आहे, असं संजय राऊत म्हणाले.