मुंबई । Mumbai
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी एका लग्नसोहळ्यात भेट झाली. दोघा भावांनी एकमेकांशी संवाददेखील साधला. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघं भाऊ एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, गेली अनेक वर्ष ही चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये माझ्यासारखाही सहभागी असतो. मी राज ठाकरे यांच्यासोबतही जवळून काम केले आहे. तर, उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचे जीवापाड प्रेम आहे. पण काही गोष्टींमुळे ते एकत्र येणे कठीण आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “राज ठाकरे यांचा एक वेगळा पक्ष आहे. तर, आमचा उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा आहे. राज ठाकरेंनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे. त्यांचा पक्ष हा भाजपसोबत काम करतो. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. पण आमच्या पक्षाचे तसे नाही. फडणवीस, मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही.
तसेच महाराष्ट्र लुटण्यात, मुंबई लुटण्यात, मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये आणि शिवसेना फोडण्यामध्ये या तिघानाचा मोठा सहभाग आहे. अशा लोकांसोबत जाणे हे महाराष्ट्राशी बेइमानी ठरेल. दुर्दैवाने राज ठाकरे त्यांच्यासोबत राहतात. कुटुंब एकच असले तरीही वैचारिक मतभेद आहेत. असे म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत दिले.