मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला होता. यावर संजय राऊतांनी तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील असेल असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होत असल्याचा अर्ज लिहिण्यासाठी ते बहुतेक संघाच्या मुख्यालयात गेले होते. माझ्या माहितीनुसार, १०-१२ वर्षात ते कधी गेले नाहीत. ते मोहन भागवतांना आता मी जात आहे हे सांगण्यास गेले होते. मोहन भागवत आणि संपूर्ण संघ कुटुंब देशाच्या नेतृत्वात बदल अपेक्षित करत आहे. मोदींची वेळ संपली असून देशात बदल अपेक्षित करत आहे. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्षही आपल्या स्वेच्छेने निवडण्याची इच्छा आहे. त्यासाठी मोदी गेले होते. नरेंद्र मोदी जात आहेत,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रातील असणार
खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रातील असेल आणि तो संघ ठरवेल असे वाटत आहे. संघाची चर्चा ही बंद दाराआड होते. शक्यतो बाहेर येत नाही, परंतू संघाच्या चर्चेतून काही संकेत मिळत असतात, असेही राऊतांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी ७५ वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असे धोरण जाहीर केले होते. तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. त्या दृष्टीनेही विचार सुरु आहे. त्यामुळेच ११ वर्षानंतर मोदी हे संघाच्या मुख्यालयात आले असल्याचा दावाही ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“ज्या अर्थी मोदींना नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागले ही साधी गोष्ट नाही. नड्डा यांनी तर ४०० पार करण्यासाठी संघाची गरज नाही असे म्हटले होते. जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींची भूमिका असते. त्यामुळे त्यांना मुख्यालयात का जावे लागले हे स्पष्ट आहे,” असा अंदाज संजय राऊत यांनी वर्तवला आहे.
वडील जिवंत असताना…
संजय राऊत यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली. ‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचे कोणतेही कारण नाही, मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत, आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , २०२९ चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा