मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी नुकताच “महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ” असा संकेत दिला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनीही तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही नेते एका मंचावर येणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींवर बोलताना खासदार संजय राऊत यांनीही मोठे विधान केले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील, तर त्यावर कोणताही वाद नसावा.”
राऊत म्हणाले, “काही लोकांना हे एकत्र येणं सहन होत नाही. म्हणून ते यात अटी-शर्ती शोधत आहेत. पण दोघांनीही महाराष्ट्र हिताचा मुद्दा मांडला आहे. यात कुठे अट आणि कुठे शर्थ?”
“भाजप आणि त्यांच्या सोबत असलेले पक्ष या महाराष्ट्रहिताच्या फॉर्म्युलात बसत नाहीत. ही अट नसून लोकभावना आहे. त्यामुळे हे एकत्र येणं कोणत्याही अटींशिवाय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राऊत पुढे म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं आहे. राज आणि उद्धव दोघांसोबतही मी काम केलं आहे. सध्या आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र काम करत आहेत. आमचं एकच ध्येय आहे – महाराष्ट्र हित. बाळासाहेबांनी याच उद्देशाने शिवसेना स्थापन केली होती.”
शेवटी राऊतांनी राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे संकेत देताना म्हटले, “जे महाराष्ट्रासाठी काम करतील त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या शत्रूंशी मात्र कोणताही संबंध ठेवू नका. अट आणि शर्थ वाटत असतील, तर राजकारणाचा अभ्यास करा.”
या वक्तव्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार की काय, याबाबत चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. आगामी काळात या राजकीय समीकरणांचे काय स्वरूप असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.