मुंबई । Mumbai
पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, धंगेकरांचा हा निर्णय स्वेच्छेने घेतलेला नाही, तर त्यांच्या वर दबाव टाकून घेतला गेला आहे. त्यांच्या कसबा मतदारसंघातील गणेश पेठ भागातील एका ६० कोटी किंमतीच्या जागेवरून वाद निर्माण करण्यात आला. ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करीत काही मुस्लिम गट आणि भाजप नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. परिणामी, या विकासकामांना स्थगिती देण्यात आली.
राऊत यांच्या मते, या प्रकरणात धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना अटक होण्याची भीती दाखवली गेली. या प्रकरणात त्यांच्या पार्टनरचीही अडचण निर्माण करण्यात आली, जे भाजपचे माजी नगरसेवक आणि मनसेच्या माजी नगरसेवकाच्या पत्नी आहेत. यामुळेच धंगेकर यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी पुढे सांगितले की, धंगेकर यांच्यावर पक्षांतरासाठी दबाव टाकण्याचा प्रकार हा अपवादात्मक नाही. याआधीही अनेक नेत्यांवर अशीच आर्थिक आणि कायदेशीर कोंडी करून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडले गेले आहे. रविंद्र वायकर यांचेही उदाहरण देत राऊत यांनी सांगितले की, त्यांच्यावरही गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडण्यात आले होते. पक्ष बदलताच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले होते.
राऊत यांनी थेट आरोप केला की, सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून अशा प्रकारे लोकांना पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. अजित पवार, शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते प्रवेश करत आहेत आणि त्यामागे केवळ राजकीय स्वार्थ नसून दबावाचे राजकारण आहे.
राऊत यांनी असा सवाल केला की, धंगेकर यांनी का प्रवेश केला हे स्पष्ट करण्याची जबाबदारी शिंदे आणि अजित पवार गटाने घ्यायला हवी. काँग्रेसला सोडून शिंदे गटात गेलेल्या धंगेकरांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.