नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. दरम्यान, ठाकरेंना अपमानजनक वागणूक दिल्याचा सत्ताधारी पक्षांचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊतांनी खोडून काढला आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर मंडळी पुढल्या रांगेतच बसली होती असे सांगताना अचानक ही मंडळी मागे बसायला का गेली हे संजय राऊतांनी सांगितले. तसेच टीका करणारे लोक भंपक आहेत, तर नरेश म्हस्के हे दुतोंड्या गांडूळ आहेत, असे राऊतांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत घोटाळे झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची राहुल गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देखील राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यावर प्रेझेंटेशन दिले. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागे बसले होते. यावरुनच उद्धव ठाकरे यांना मागे का बसवले अशी चर्चा सुरु झाली.
म्हणून आम्ही उठून मागे बसायला गेलो
यावेळी त्यांना इंडि आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा याबाबतचे स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो होतो. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होते. उद्धव ठाकरेंना पुढे बसवले होते. पण उद्धव ठाकरे म्हणाले की, स्क्रीनच्या समोर बसून नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सगळेच पाठीमागे गेलो. आपण स्क्रीनवर सिनेमा बघतो तेव्हाही आपल्याला नीट दिसत नाही. तर यावेळी आम्हाला हे प्रेझेंटेशन मागे बसून पाहायचे होते. म्हणून मग आम्ही सगळेच मागे गेलो. स्क्रीनवर एखादी गोष्ट पाहताना आपण पहिल्या रांगेत बसलो तर त्यावेळी डोळ्यांना त्रास होतो. म्हणून आम्ही स्वतःच उठून मागे बसलो. कारण ती वेगळी जागा होती. ती बसण्याची जागा नव्हती. तिथे प्रेझेंटेशन सुरू होते, असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले.
उध्दव ठाकरेंचे अजून फोटो आहे ते पाहिले नाही का?
हे भाजपचे आयटी सेलवाले फालतू लोक आहेत. त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरेंचे अजून पण फोटो आहेत, ते तुम्ही पाहिले नाहीत का? उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचा नवीन घर संपूर्ण दाखवले. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वतः तिथे होतो. कमल हसन होते. शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते. प्रमुख नेत्यांना पुढे बसवले होते. पण, उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
नरेश म्हस्के दुतोंड्या गांडूळ
इंडि आघाडीच्या बैठकीत ठाकरे शेवटच्या रांगेत बसले असल्याचा फोटो शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा शेअर केला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्या म्हस्केंना सांगा की, दुतोंड्या गांडुळा… बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडताना तुम्हाला मान अपमान दिसले नाही का? इथे येऊन तुम्ही मोदी आणि शहांची चाटूगिरी करता. तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आम्ही आमचे बघू ना, असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




