मुंबई | Mumbai
काल शिर्डीत (Shirdi) भाजपचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनातून बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली, अशा शब्दांत अमित शाह यांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शाह यांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगाफटका केलेला नाही. तर भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचे काम अमित शाह आणि मोदींनी केले आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे,” असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणे हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का? आवडलं आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, अशी टीकाही यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
इंडिया आघाडी बळकट व्हावी
इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी, टिकावी आणि देशाच्या राजकारणात अधिक पुढे जावी, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, पण गेल्या काही दिवसांपासून आमचे काही घटकपक्ष या भूमिकेत आहेत की, संवाद तुटला आहे. संवाद तुटला तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद तुटला म्हणून युती तुटली, २०१९ मध्ये योग्य संवाद झाला नाही म्हणून युती तुटली. इंडिया आघाडीमध्ये ३० पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेकदा सांगितले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.