Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्या“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम…”; 'व्हायब्रंट गुजरात' कार्यक्रमावरून राऊतांनी शिंदेंना डिवचलं

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम…”; ‘व्हायब्रंट गुजरात’ कार्यक्रमावरून राऊतांनी शिंदेंना डिवचलं

मुंबई | Mumbai

गुजरात सरकारने व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाचे आज (11 ऑक्टोबर) मुंबईत आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजराला नेण्यासाठी, तसेच आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केले असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

यावेळी संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जाणार हाच अंगार आणि भंगारमधला फरक आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. याचदरम्यान, ‘एकनाथ शिंदे अंगार हैं, बाकी सब भंगार हैं’, अशी घोषणा शिंदे गटातील नेत्यांनी दिली आहे. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखे जावे लागत आहे. इथे व्हायब्रंट महाराष्ट्राचा आत्मा काढून गुजरातला पाठवला जातो आहे. जो महाराष्ट्र या देशात उद्योगक्षेत्रात सर्वाधिक व्हायब्रंट होता, त्या महाराष्ट्राला संपवून, मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

गुजरातसाठी मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतो आहे, मग महाराष्ट्रासाठी तुम्ही गुजरातला जात आहात का? अहमदाबादला, लखनौला किंवा दिल्लीला जात आहात का? महाराष्ट्रासाठी कधी गेला आहात का? असे प्रश्न विचारत संजय राऊत म्हणाले की, तुम्ही गुजरातसाठी जात आहात, कारण तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे. आम्ही आमच्या गळ्यात कोणाचे पट्टे बाधून घेतले नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या