मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनीट्रॅपचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ७२ जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हनीट्रॅप (Honey Trap) प्रकरणी चौकशी सुरु असून, या प्रकरणात विरोधकांकडून दररोज वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी एक ट्विट केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यंच्या सोशल मीडियावर (Social Media) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि हनीट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा (Praful Lodha) यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन यांना पेढा भरवताना दिसत आहे. या फोटोची सीबीआयमार्फत (CBI) चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
तसेच “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही (Vidhansabha) दिशाभूल करतात. महाराष्ट्रात (Maharashtra) हनीट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेव्हा) याच ट्रॅपमुळे पळाले,” असा खळबळजनक दावाही राऊत यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) आणखी तापण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) जामनेर तालुक्यातील पहूर येथील मूळ रहिवासी असलेला ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्यावर नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे, त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी देणे आणि मुलींना डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपांवरून मुंबईतील साकीनाका पोलीस (Sakinaka Police) स्टेशन आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात पॉक्सो, बलात्कार, खंडणी आणि हनीट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी लोढाला अटक (Arrested) केली आहे.




