मुंबई | Mumbai
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील सध्याचा काळ हा ‘अंतिम पर्व’ असल्याचे सांगत, “मोदी आणि त्यांचे लोक केव्हा तरी जातील, पण जाताना देशाचे तुकडे करून जातील,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राऊत म्हणाले, “देशात सध्या वाढणारा जातीय आणि धार्मिक द्वेष १९४७ पूर्वी फाळणीच्या आधी दिसत होता. त्या वेळी जशी परिस्थिती निर्माण झाली, तशीच आज आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, पंडित नेहरूंनी ‘भारत हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही’ असे ठामपणे सांगितले होते. परंतु, आज देश धर्मांधांच्या हाती गेल्याचे ते म्हणाले. “संघ परिवाराचे नियंत्रण सुटले आहे. ते दंगली घडवणे, मशिदींवर हल्ले करणे यामध्ये व्यग्र आहेत,” असे आरोप करत, राऊतांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत ३,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. “शेतकरी हिंदू नव्हते का? संघ, बजरंग दल यांना त्यांची चिंता नाही का?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. “सरकारमधील मंत्री हलाल आणि झटका मटणावर वातावरण तापवत आहेत. हे राज्य चालवण्याची पद्धत नाही,” असे ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, कालपर्यंत भाजप व संघावर टीका करणारे आज नवहिंदुत्ववादी होऊन भाजपात सामील झाले आहेत. “अखंड हिंदुस्थानचा नारा देताना, समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली. “अशीच परिस्थिती १९४७ पूर्वी होती. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा दोन राष्ट्रांची भीती व्यक्त केली होती. आज त्याच दिशेने परिस्थिती जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
“दिल्लीतील भाजप नेत्या इफ्तार पार्टी आयोजित करतात, पण महाराष्ट्रात भाजप नेते त्याचा विरोध करतात. हा दुटप्पा धोरणाचा प्रकार आहे,” असे राऊत म्हणाले. “भाजप नेते रोज मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकत आहेत. यावर पंतप्रधान मोदींची भूमिका काय आहे?” असा थेट सवालही त्यांनी केला.
“संघाला हाफ चड्डीवालं म्हणणारे, फडणवीसांना शिव्या देणारे आज हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत हे सहन कसे करत आहेत?” असा प्रश्न उपस्थित करत, हलाल-झटका वादामुळे हिंदुत्वाला झटका बसेल, असा इशारा राऊतांनी दिला.