नाशिक । Nashik
नाशिकमधील अनधिकृत दर्ग्यावरील बांधकाम हटवण्याची कारवाई बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात काही पोलिस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
दुसरीकडे, नाशिकमध्ये आज शिवसेना (ठाकरे गट) चे एक दिवसीय निर्धार शिबिर सुरू आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
राऊत म्हणाले, “शिबिरात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला घाबरवण्याचा हेतू आहे. दर्ग्यावर कारवाईसाठी आजचाच दिवस का निवडला? हे सर्व लक्ष विचलित करण्यासाठीचे डावपेच आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले, “दर्ग्यावर बुलडोझर चालवून शहरात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हिंमत असेल, तर समोर येऊन लढा. आम्ही तयार आहोत.”
राऊतांनी हा मुद्दा उपस्थित केला की, पंधरा दिवसांची नोटीस आधीच देण्यात आली होती, मात्र कारवाई शिबिराच्या दिवशीच का केली? “भाजप नेहमीच मुहूर्त काढतो, दंगल कधी घडवायची, हे आधीच ठरवतो,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. यावर राऊत म्हणाले, “ते आमरस पुरी खायला भेटले असावेत. युती झाली तर बघू. सध्या अमित शाहच तीन पक्ष चालवत आहेत.” शिवसेना ठाकरे गटाच्या शिबिरावर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.