मुंबई | Mumbai
पुण्यातीत खराडी भागात एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या खराडी भागातील उच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, मद्य आणि हुक्काचे सेवन सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत म्हणाले की, दोन दिवसांपासून खडसे साहेब सरकारच्या विरोधात आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधात ठामपणे बोलत आहेत. पुराव्यांसह बोलत आहेत. त्यानंतर पुढील २४ तासातच ही कारवाई झाली. एकनाथ खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव्ह पार्टी आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या दोन लोकांना मिस्टर महाजन आज प्रवेश देत आहेत. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर पक्षात आणण्याचा दबाव आणला आणि भाजपमध्ये येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले, हे एक नवीन तंत्र आहे.
“या सरकारच्या काळात कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारु पितो म्हणून अटक केली जाईल. काहीही होऊ शकतो. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा भाजप विरोधात असलेल्यांना याप्रकारे त्रास देण्यासाठीच इथे आहेत. बाकी सरकारमध्ये काहीही काम नाही. मी याबद्दल माहिती घेईन. याआधीही खडसेंच्या जावयाला ईडीने ताब्यात घेतले होते, पण त्यात काही मिळालेले नाही.
गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलेला
आमचे सुधाकर बडगुजर होते,त्यांच्या कुटुंबीयांवर मकोकाच्या कारवाया केल्या. भाजपात गेले आणि रफादफा झालं. नगर जिल्ह्यातील आमचे शहरप्रमुख किरण काळे यांनी भ्रष्टाचाराविरोधात नगरमध्ये आंदोलन सुरू केले. 400 कोटींचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटणाचे कारण नाही. फडणवीस यांच्या राज्यामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला सामोरे जावे लागेल. गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरले नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




