मुंबई । Mumbai
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात येणार आहे. याप्रकरणी दिशा सालियनचे वडील कोर्टात गेले असून त्यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी व्हावी, याकरता याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी याआधीही राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरलं होतं. तसंच, आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात घेऊ नये याकरता उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोनवेळा फोनही केला होता, असं दावा नारायण राणे यांनी काल (२२ मार्च) केला. हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडला आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे हा जुना राग पुन्हा आळवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्र परिषद घेतली. त्यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. आपण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना या दाव्याविषयी विचारणा केली. या दोघांनी राणे यांना फोन केल्याचा इनकार केला आहे असा खुलासा संजय राऊत यांनी केला. नारायण राणे इतक्या वर्षानंतर कशाच्या आधारावर असे वक्तव्य करत आहेत, हे समजून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आता सत्तरी पार केली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केले. त्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. त्यांना सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना काही त्रास आहे. केंद्रातून सुद्धा फोन आला होता. त्यांच्या सुटकेसाठी अमित शाह यांचा फोन आला होता. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना केल्या आणि त्यांची सूटका झाली असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला.
सुशांत सिंग आणि दिशा सालियन या दोन्ही आत्महत्या असल्याचं वारंवार सिद्ध आणि स्पष्ट झालं आहे. पण विरोधकांचा आणि खासकरुन ठाकरे कुटुंबाचा राजकीय बदनामीचा कट करण्यासाठी कधी हत्या तर कधी इतर वेगळा रंग देण्यात आला. पाच वर्षांनी दिशा सालियनच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. जसं औरंगजेबाचं राजकारण चाललं आहे, तसंच मृतांचं राजकारण सुरु आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, भाजपाचे लोक मृतांनाही सोडत नाहीत. चांगल्या घरातील लोक मृत पावल्यानंतर दुर्देव असतं, मात्र त्याचंही राजकारण करतात. त्या बदनामीत अनेक चांगल्या घरातील लोकांवर चिखल फेकून बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण भाजपाने सुरु केलं आहे. सगळ्यांना आता त्रास होत आहे, पण भाजपाचा हेतू साध्य होत नाही. ठाकरे, अनिल परब आणि आमच्यासारखे लोक ठामपणे लढत उभे आहेत.