मुंबई | Mumbai
माणिकराव कोकाटे यांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंनी अखेर आपल्या क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला मारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्या टप्प्याने गेम करतील असा सूचक इशारा महायुतीतील दोन घटक पक्षांना दिला आहे. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का? अशी शंकाही संजय राऊतांनी उपस्थित केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. १८ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साघला. यावेळी त्यांना माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी बुधवारी (ता. १७ डिसेंबर) दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की, सत्तेचा वापर करून, आमिष दाखवून पक्ष आणि माणसे फोडण्यात अमित शहा पटाईत आहेत. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही, हे आता सांगता येणार नाही. पण त्यांना मंत्री पदी स्थानापन्न करणे, हे फडणवीसांसाठी सोपे नाही. मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप करणार नाही, उलट ते या लोकांचा टप्प्याटप्प्याने गेम करणार असा दावा राऊतांनी केला आहे.
फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री, भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी मुळे गेले. ही या सरकारला लागलेली काळीमा आहे. खरे म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत. त्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. इतर ही अनेक विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
अजित पवारांशी युती करणे ही भाजपशी हातमिळवणी असल्याचे आम्ही मानतो असे मोठे वक्तव्य राऊतांनी केले. तर अजित पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर ते नाराज असल्याचे दिसून आले.
आज शरद पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी आघाडीत बाबत चर्चा होईल. राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसचाही संदश आला आहे. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधुंचाच असेल. महापौर हा अस्सल मराठी माणूसच असेल असे संजय राऊत यांनी सांगितलं.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




