मुंबई | Mumbai
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरीची शाल जेव्हा अंगावर पडते, तेव्हा याचा अर्थ थांबायचा असतो, असे सुचक विधान एका कार्यक्रमात केले आहे. त्यावरून आता वेगवेगळे राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
‘जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळे यांनी घालून दिला होता,’ याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी काढली. दुसरीकडे, ‘राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवणार आहे,’ असे वक्तव्य अहमदाबाद येथे बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. या दोन्ही वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होतील, त्यांनी राजकरणातून निवृत्ती घ्यावी. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर त्यांनी निवृत्ती लादली होती, आता मोदींनीही ७५ वर्षे झाल्यावर निवृत्ती घ्यावी, असे संजय राऊत म्हणाले आहेत. मोहन भागवत हे मोदींना वारंवार निवृत्तीचे संकेत देत असल्याचा निशाणा साधला. दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत, असल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावला.
दाढी पिकलेली, डोक्यावरील केस उडालेले
“सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी हे ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहे, डोक्यावरील केस उडालेले आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सगळी सत्तेची सुख भोगलेली आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान मोदी यांना निवृत्त होण्यासाठी सूचना देत आहे. आणि देश सुरक्षित हातात द्यावा लागेल,” असे खासदार राऊत यांनी म्हटले.
मोदींनी अनेकांवर निवृत्ती लादली
नरेंद्र मोदी हे जेव्हा प्रथम संघ मुख्यालयात प्रथम गेले होते. तेव्हा सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, या चर्चेचा सारांश टाकला होता. यात नरेंद्र मोदी यांनी जो स्वत:च नियम बनवला आहे किंवा संघाने जो नियम केलेला आहे की ७५ वर्ष झाले की सत्तेच्या पदावरुन निवृत्ती पत्करावी. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह अशा अनेक नेत्यांवर ही निवृत्ती जबरदस्तीने लादली. आपल्या स्वार्थासाठी आणि आपले मार्ग मोकळे करण्यासाठी हे करण्यात आले, असा आरोप संजय राऊतांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




