मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये तातडीने जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आणि अन्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळी उडाली आहे. त्यातच शिवसेना आमदार, मंत्री, संजय शिरसाट हे सातत्याने वादात सापडत असल्याचे समोर येत आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात संजय शिरसाट हे आपल्या बेडरूममध्ये बसलेले असून सिगारेट पिताना दिसत आहेत. त्यासह संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी शिवसेना आमदार अडचणीत असल्याने सुद्धा तक्रारी केल्याचं राऊत यांनी म्हटल आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सुद्धा पुन्हा एकदा तक्रार केल्याचा राऊत यांनी दावा केला.
आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा संजय शिरसाट यांचा व्हिडिओ ‘एक्स’अकाऊंटवर टाकला आहे. त्यावर लिहिलेल्या कॅप्शनमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘स्वत:च्या अब्रुचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत,’ असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1943602319989596317
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हंटले आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस! अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला आहे. हाच व्हिडिओ त्यांनी हिंदीमध्येही पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पीएमओला टॅग केलं आहे.
संजय शिरसाट व्हिडीओवर काय म्हणाले?
व्हिडीओ काय दाखवतोय? माझे घर आहे. जे घर तुम्ही पाहात आहात ते माझ घर आहे, बेडरुम आहे. बेडरुममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, मी कुठून तरी प्रवासातून आलोय. कपडे काढले आहेत, मी माझ्या बेडवर बसलेलो आहे. अरे मुर्खांनो एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का? मी नोटा कपाटात ठोसल्या असत्या. यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





