मुंबई | Mumbai
खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची गुरुवारी एका खासगी कार्यक्रमात भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांना अभिवादन करत, हस्तांदोलनही केलं. यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली.
खासदार संजय राऊत यांना एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की, “मी कसे काय ठरवून भेटेन? अशा भेटी अनपेक्षित असतात. जरी राज्याचे बेकायदेशीर असले तरी ते उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती कार्यक्रमात आली म्हणून बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही. माझा कार्यक्रम झाल्यावर ते समोर होते. हाय, हॅलो झाले आणि निघून गेलो.” असे म्हणत त्यांनी भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. “एकेकाळी त्यांचे येथे येणे जाणे होते. आमचे सहकारी होते, जवळचे मित्र होते हे सत्य आहे. आता त्यांनी पळ काढला, त्याला आम्ही काय करणार? आम्ही आहोत तिथेच आहोत.” असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
भेटीनंतर काय वाटले असे विचारले असता संजय राऊतांनी मला काही वाटले नाही, कशाकरता वाटावं? त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. “ते भाजपासोबत सत्तेत आहेत. त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे. अमित शाह त्यांच्या पक्षाचे नेते आणि आमच्या दृष्टीने महाराष्ट्राचे दुश्मन, शत्रू आहेत. म्हणून तर दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनांविरोधात लढत आहेत असेही राऊतांनी म्हटले.
“जे नितीमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर पळून जाणारे नजरेला नजर भिडवू शकत नाहीत. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीला अजित पवारही शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. हे सर्वत्र आहे.”, असे म्हणत संजय राऊत यांनी सूचक विधान केले.
कुठे झाली दोघांत भेट?
गुरुवारी (9 जानेवारी) एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच राऊत आणि शिंदे अशाप्रकारे एकमेकांच्या आमने-सामने आले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून आले की, हिंदी वृत्तवाहिनीची मुलाखत आटोपून एकनाथ शिंदे हे बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होणार होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे हे समोरून येत होते. हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना अभिवादन केले. मात्र संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना अभिवादन न करताच आपले हात मागे ठेवले.




