नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. जगदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या राजीनाम्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची शक्यताही विरोधकांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं असून, जगदीप धनखड कुठे आहेत? अशी विचारणा केली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, “देशातील इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांचे काय झाले? त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत देशातील जनतेच्या मनात चिंता निर्माण झाली असून केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन जनतेला उत्तरे द्यावीत.” राऊत यांनी दावा केला आहे की “माझ्यासह इतर काही राज्यसभा सदस्यांनी धनखड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु,आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही त्यांच्या घरी देखील गेलो होतो. परंतु, आम्हाला आत जाऊ दिले नाही.”
राऊत पुढे म्हणाले, राज्यसभेतील काही सहकारी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पसची रिट याचिका दाखल करण्याचा विचारही करत असल्याचे पत्रातून सांगितले आहे. २१ जुलैपासून आजपर्यंत, आमच्या उपराष्ट्रपतींच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांचे सध्याचे स्थान काय आहे? त्यांची प्रकृती कशी आहे? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
संजय राऊत असे ही म्हणाले की, “जगदीप धनखड ज्या पद्धतीने बेपत्ता झाले आहेत, त्यामुळे ही राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशात चीन व रशियासारखा पॅटर्न राबवला जात आहे का? सरकारला नको असलेली माणसे गायब केली जात आहेत का? सरकारने तसा कायदा केला असेल तर आम्हाला त्याविषयी माहिती द्यावी. कोणी आमच्याविरोधात बोलले, वागले, कृती केली तर आम्ही त्यांना गायब करू असे सरकारने एकदाचे स्पष्ट करून टाकावे.”
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित एका विशिष्ट कारणासाठी मी हे पत्र लिहित आहे. २१ जुलै रोजी संसदेचे अधिवेशन सुरू झाले. सकाळी ११ वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केले. अधिवेशनादरम्यान, ते सामान्य दिसले आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने अधिवेशनाचे कामकाज चालवले.
त्यांच्या आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावरून असे दिसून येते की त्यावेळी अध्यक्षांची प्रकृती ठीक होती. तथापि, त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर, उपराष्ट्रपतींनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करण्यात आली. हे सर्वांसाठी धक्कादायक होते.
तथापि, त्याहूनही धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे २१ जुलैपासून आजपर्यंत, आमच्या उपराष्ट्रपतींच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांचे सध्याचे स्थान काय आहे? त्यांची प्रकृती कशी आहे? या बाबींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद झालेला नाही, ही गंभीर चिंतेची बाब आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




