कोलकाता । Kolkata
कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
९ ऑगस्ट २०२४ ला कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या टाऊन हॉलमध्ये या डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. हे क्रौर्य पाहून पोलीस आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टरही हादरले होते. तसंच पुढील दीड महिना या महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला होता.
कोर्टात आर. जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरकारी वकिलांनी हे म्हटलं आहे की ज्या प्रकरणांमध्ये आरोपींच्या सुधारणेला काहीही वाव नाही अशा प्रकरणांसाठी फाशीची शिक्षा राखीवच ठेवली पाहिजे. तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी आरोपीचं मानसिक आरोग्य ठीक नसल्याची कारणं दिली आणि फाशीची शिक्षा देण्याऐवजी पर्यायी शिक्षा देण्यात यावी असं म्हटलं होतं. सियालदह न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.