मुंबई । Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा दुखवटा अद्याप सरला नसतानाच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या घाईघाईने होणाऱ्या राजकीय घडामोडींवर आता महायुतीतूनच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “राजकारणात माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व दिले जात आहे,” अशी भावना त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन अवघे चार दिवस उलटले आहेत. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणे हे अनाकलनीय असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “अजितदादांच्या निधनानंतर इतक्या वेगाने सूत्रे हलतील, अशी अपेक्षा नव्हती. किमान काही दिवस थांबून या हालचाली व्हायला हव्या होत्या. मात्र, सुनेत्रा पवार यांचे तातडीने मुंबईला जाणे आणि नेत्यांची विधाने येणे, हे सर्व अनपेक्षित आहे. हा शपथविधी आठ दिवसांनी झाला असता तर चालले नसते का? यांना नेमकी कसली भीती सतावत आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संजय शिरसाट यांनी यावेळी राजकीय नैतिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “दुखवटा पूर्ण होण्याआधीच अशा प्रकारे शपथविधी होणे योग्य नाही. ही केवळ माझीच नाही, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची भावना आहे. अलीकडच्या काही घटनांवरून असे स्पष्टपणे जाणवते की, नात्यांपेक्षा आणि माणसांपेक्षा सत्तेची खुर्ची अधिक महत्त्वाची ठरत आहे.” अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते होते, मात्र त्यांच्या पश्चात आता केवळ सामूहिक निर्णयांचा काळ सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करताना शिरसाट यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली. शरद पवार यांनी ‘चर्चेत खंड पडेल’ असे जे सूचक विधान केले आहे, त्यावरून या घडामोडींमध्ये त्यांची नेमकी संमती किती आहे, हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल बोलताना, पवार कुटुंबातीलच एखादी व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष होईल, असे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजपची जी भूमिका आहे, तीच आमची असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. “देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका हीच आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाचा निर्णय स्वतः घ्यावा, आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक विषय होता. जर ते एकत्र आले असते, तर त्यांचा समावेश एनडीए महायुतीत झाला असता,” असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक राजकारणातील वादावर बोलताना त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना इशारा दिला की, वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका.




