Friday, September 20, 2024
Homeनगरमाऊलींच्या पुण्यभूमीत रंगला वारीतील पहिला रिंगण सोहळा

माऊलींच्या पुण्यभूमीत रंगला वारीतील पहिला रिंगण सोहळा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिर देवस्थानच्यावतीने काढण्यात आलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे मंगळवारी दि.2 जुलै रोजी हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले.या दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी करत चौकाचौकांत स्वागत करण्यात आले.ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात माऊलींच्या पुण्यभूमीत दिंडीतील पहिला रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

मंगळवारी माऊलींच्या योगिनी एकादशीच्या निमित्ताने सकाळी पैसखांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून हभप देविदास महाराज म्हस्के यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, यांनी पालखीतील पादुकांचे पूजन केले. हभप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. यावेळी कै. लक्ष्मीबाई खंडाळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ खंडाळे परिवाराच्या वतीने वारकर्‍यांना शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिर रंगरंगोटी कामासाठी पन्नास हजारांची देणगी दिल्याबद्दल रामभाऊ खंडाळे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी हभप देविदास महाराज म्हस्के म्हणाले,
त्रिभुवनैकपवित्र ।
अनादि पंचक्रोश क्षेत्र ।
जेथ जगाचें जीवनसूत्र।
श्रीमहालया असे ॥
असे वर्णन ज्ञानोबारायांनी केले त्या पुण्य पावन नेवासेच्या पैस खांबापासून वै.बन्सी महाराजांनी सुरू केलेल्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे हे 55 वे वर्ष आहे.बाबांनी दिलेली संस्काराची शिदोरी अन्यत्र मुश्कीलीने पाहण्यास मिळते हे या दिंडी सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून आषाढी वारी पायी पालखी दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी नृत्य करणारे अश्व,त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे, वारकरी, भजनी मंडळ , पुष्पांनी सजविण्यात आलेला पालखी रथ, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते. दिंडीचे नेवासा नगरीत आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत चौकाचौकांत स्वागत करण्यात आले.विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यां सह, व्यापारी ,भाविक यांनी देवस्थानचे महंत हभप देविदास महाराज म्हस्के यांचे संतपूजन करत पालखीचे दर्शन घेतले.

यावेळी निघालेल्या दिंडीत रामकृष्ण आश्रमाचे येथील महंत हभप भगवान महाराज जंगले शास्त्री,रामेश्वर महाराज कंठाळे,नंदकिशोर महाराज खरात,संजय महाराज सरोदे,रामकृष्ण महाराज काळे,श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,विश्वासराव गडाख, ज्ञानेश्वर शिंदे,रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, रामनाथ महाराज पवार, कृष्णा महाराज हारदे,राम महाराज बोचरे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिंडीचे एस.टी.च्या प्रांगणात आगमन झाले असता आगार व्यवस्थापक रामनाथ मगर व सौ.पुष्पाताई मगर यांच्यासह एस टी कर्मचार्‍यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात वारकर्‍यांचे रिंगण पार पडले. यावेळी माऊली माऊली असा जयघोष करत सर्वप्रथम झेंडा पथकाचे,त्यानंतर भजनी मंडळ व वारकर्‍यांसह महिलांचे रिंगण सादर करण्यात आले संगमनेर येथील प्रा.डॉ.विजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेले अश्व नृत्य उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरले होते. या दिंडी सोहळयाच्या स्वागत प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नेवासा येथील वकील कॉलनीत दिंडी आली असता अ‍ॅड.भागवत शिरसाठ यांच्या वतीने दिंडीस अल्पोपहार देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या