Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधसंत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा

– सुरेखा बोऱ्हाडे

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

- Advertisement -

संत कान्होपात्रा 15 व्या शतकातील वारकरी संप्रदायातील मराठी संत कवयित्री म्हणून प्रसिद्धीस आली. गणिकेच्या पोटी जन्म झाल्यामुळे लहानपणापासून नाच गाण्याचे वातावरण असले तरी कान्होपात्राच्या मनामध्ये मात्र विठ्ठल भक्ती रुजली होती. ती जशी मोठी होत होती तसतशी तिची विठ्ठल भक्ती वाढत होती. या विठ्ठल भक्तीमधूनच भावोत्कटतेने तिने काव्य निर्मिती केली. अतिशय रूप संपन्न, हुशार असलेल्या कान्होपात्राला अनेक धनी लोकांनी आणि बिदरच्या बादशहाने मागणी घातली. परंतु या लौकिक जगात तिला विठ्ठलभक्ती शिवाय काहीही नको होते. असीम विठ्ठलभक्ती आणि अमोल अशा पद्यरचनेमुळे संत कान्होपात्रा अद्वितीय ठरली.

जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई ।

सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही ॥ 1॥

आला अपवाद याती संबंध लौकिक पाही।

सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ॥2॥

शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळा पाही ।

सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ॥3॥

कान्होपात्राचा हा प्रसिद्ध अभंग जनमनावर कोरला गेला आहे.

कान्होपात्राचा जन्म पंढरपूरजवळील मंगळवेढा या गावी शामा नावाच्या गणिकेच्या पोटी झाला. नाचगाणे करणार्‍या तिच्या आईकडे अनेक प्रतिष्ठितांचे येणे जाणे होते. कान्होपात्रा अतिशय रूपवान होती. कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची ओढ होती.

कान्होपात्रा रूपवती होती. तितकीच बुद्धिमानही होती. ती मेनका-अप्सरेचा अवतार असल्याचे लोककथांमधून मांडले गेलेंय. गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवले होते. हळूहळू तिचं कलानैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती् दूरवर पसरली. अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या. शामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा. राजदरबारी रूजू व्हावे असे शामाला वाटत होते. तर कान्होपात्रेला ते आवडत नसे.

मंगळवेढ्याच्या तत्कालीन नगराध्यक्षाची नजर कान्होपात्रेवर पडली. त्याने कान्होपात्रेचे नाचगाणे बघण्याची इच्छा व्यक्त केली. शामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसेबसे त्याच्यासमोर आणले. आपण गायन-नृत्य करणार नाही असे तिने त्याच्या तोंडावर सांगितले. भडकलेल्या नगराध्यक्षाने सूडसत्र सुरू केले. शामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला. वैभव ओसरले. त्याच्याविरूद्ध न्याय कोण देणार? अखेर शामाने त्याची माफी मागितली. त्याने तीन दिवसांत कान्होपात्रेला समोर आणून उभे करण्याचा हुकुम दिला. या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही. ती देवासमोर हात जोडून जप करू लागली. रात्रभर ती जप करतच होती. पहाटे डोळा लागला आणि भजन-टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली. गावातील वारकर्‍याची दिंडी पंढरपुरला निघाली होती.विठ्ठल भक्तीच्या ओढीने ती गुपचूप वारीबरोबर पंढरपूरला गेली. पुढे पंढरपूरात अनेक संतांचा, वारकर्‍यांचा कान्होपात्रेला सहवास लाभला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला.

धन्य कान्हुपात्रा आजी झाली भाग्याची ।

भेटी झाली ज्ञानदेवाची ह्मणुनिया ॥

या संत संगतीमुळे ती पुरती बदलली आणि तिच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडला.सतत हरिनामात दंग राहाणे आणि कीर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या.विठ्ठल भक्तीत आणि भक्तांच्या सहवासात ती रमली. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन ती नेहमी मंदिराच्या दारातून घेत असे. अनेक भक्तिपूर्ण अभंगांची रचना करून ही काव्य फुले संत कान्होपात्रा विठ्ठल चरणी अर्पण करत असे.

योगिया माजी मुगुट मणी। त्रिंबक पाहावा नयनी॥

माझी पुरवावी वासना। तू तो उध्दराच राणा॥

करूनिया गंगा स्नान। घ्यावे ब्रम्हगिरीचे दर्शन॥

कान्होपात्रा म्हणे पंढरीराव। विठ्ठल चरणी मागे ठाव॥

एके दिवशी बिदरच्या एका माणसाने तिला पाहून तिच्या रूपाचे वर्णन बिदरच्या बादशहाकडे केले. कान्होपात्राच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून बादशहाने तिला आणण्यासाठी रक्षकांना आज्ञा दिली. विठ्ठल मंदिराच्या परिसरात जाऊन बादशहाच्या सैनिकांनी कान्होपात्राला त्यांच्या बरोबर येण्यासाठी सांगितले.जर राजाचा आदेश ऐकला नाही तर तिला बळजबरीने न्यावे लागेल असे सांगितले. त्यावर तिने मी विठ्ठलाची भेट घेईन नंतर तुमच्यासोबत येते असे सांगितले. सैनिक मंदिरा बाहेर उभे राहिले.तिने मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या चरणांवर माथा ठेकवला. संत कान्होपात्राची विठ्ठलाला भावूकतेने आळवणी करणारी ही रचना ह्रदयाला पाझर फोडणारी आहे.

नको देवराया अंत आता पाहु।

प्राण हा सर्वता जावू पाहे॥

हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले।

मजलागी जाहले तैसे देवा॥

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।

धावे वो जननी विठाबाई॥

मोकलूनी आस झाले मी उदास।

घेई कान्होपात्रेस हृदयास॥

जर मला राजाकडे जावे लागले तर याचा दोष विठ्ठला तुझ्यावर येईल. मला या संकटापासून वाचवा. असे म्हणत कान्होपात्राने विठ्ठलाच्या चरणी देहत्याग केला. घडलेला प्रकार सैनिकांनी बिदरच्या बादशहाला सांगितला.

मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाजवळ थोर विठ्ठल भक्त संत कान्होपात्राचा देह मातीखाली ठेवला गेला. त्या ठिकाणी एक झाड आले. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आजतायागत ते तरटीचे हिरवेगार झाड संत कान्होपात्राच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देत उभे आहे. संत कान्होपात्रा यांनी मराठी ओव्या आणि अभंग लिहून विठ्ठलावर असणारी त्यांची भक्ती सांगितली आहे. त्यांनी लिहिलेले एकूण तीस अभंग आजही मोठ्या आवडीने गायले जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या