‘या नभाने या भुईला दान द्यावे’ असे ना.धो.महानोर म्हणत. ते दान नभाने भुईकडून परत नेले आहे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग महानोर शब्दश जगले. त्यांच्या शब्दांनी रसिकांवर आणि मराठी चित्रपटसृष्टीवर अखंड राज्य केले, यापुढेही करतील. निसर्गाचे रसरशीत भान आणि महानोर हे अतूट समीकरण होते. शेती हे त्यांचे पहिले प्रेम आहे, असे ते नेहमी म्हणत. ते हाडाचे शेतकरी होते. बांधावर उभे राहून शेती करताना अनेकांनी त्यांना पाहिले होते.
त्या प्रेमापोटीच ते ‘ या शेताने लळा लावला असा असा की, सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो’ असे लिहून गेले. त्यांनी शेतकऱ्यांना नेहमीच शेती करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या शब्दांना सुरमयी अर्थ बहाल करणाऱ्या लतादीदींच्या सुरांची मोहिनी महानोर याना न पडती तरच नवल. त्यांच्या सुरांचे इतके गारुड महानोर यांच्यावर होते की त्यांनी त्यांच्या शेतात पिकणाऱ्या सीताफळांचे ‘लताफळ’ असे बारसे केले होते. लतादीदींनी गायिलेली महानोर यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. संवेदनशील महानोरांनी माणसांची दुःखेही आपलीशी केली. ‘मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपतांना’ अशीच त्यांची भावना होती. त्यांच्या कवितांमधील शब्द लोकांच्या रोजच्या जगण्यातील आणि संवादातील होते. बहुधा त्यामुळेच लोकांच्या सहज लक्षात राहणारे आणि ओठांवर येणारे होते. म्हणून कि काय त्यांच्या कवितांना आणि गाण्यांना लोकाश्रय लाभला. राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या कुमार विश्वकोशाला महानोर यांच्या शब्दांचा साज आहे. विश्वकोशासंदर्भातील तो पहिला प्रयोग होता. ‘देवा अशी फुलु दे सृष्टी फुलाफळांनी
भरू दे सदैव देवा, हे विश्व चांदण्यांनी’ असे त्या कवितेचे शब्द होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या पुढाकाराने जल साहित्य संमेलने भरवली गेली होती. नागपूर येथे पार पडलेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद महानोर यांनीच भूषवले होते. विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांचा ठसा उमटवला होता. शेतकऱ्यांचे, नवलेखकांचे आणि कलावंताचे प्रश्न त्यांनी मांडले. आमदार एकच पण प्रतिनिधी मात्र सांस्कृतिक, शेती आणि साहित्य क्षेत्राचे. राजकीय दुर्ष्ट्या परखड मते ते व्यक्त करत. याचा अनुभव लोकांनी वेळोवेळी घेतला. कवितेने जगणे सुंदर आणि दुःख हलके केले असे ते म्हणत. त्यांच्या शब्दांनी लोकांनाही तीच अनुभूती दिली. त्यांच्या कविता आणि गाण्यांनी लोकांनाही त्यांचे दुःख क्षणभरासाठी का होईना विसरायला लावले असेल. लौकिकार्थाने महानोर आपल्यात नाहीत. तथापि त्यांचे शब्दधन मात्र समाजापासून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकणार नाही. त्याअर्थाने महानोर लोकांचा हृयदात कायमच वस्तीला असतील.