बीड । Beed
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण केज कोर्टाने कराडला आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवाय त्याच्यावर आता मकोका देखील लावण्यात आला आहे.
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला पोलिसांनी मंगळवारी केज कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी त्याच्या १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले असून भारतात किंवा भारताबाहेर त्याची संपत्ती आहे की नाही, याचा तपास करायचा आहे. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली, याचा तपास करण्यासाठी कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
न्यायालयात काय घडलं?
कडेकोट बंदोबस्तात आज वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी कराडची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. सरकारी वकिलांनी म्हटले की, वाल्मिक कराडने खंडणीची मागणी करत हातपाय तोडण्याची भाषा बोलली होती. कराड याची देशातील आणि देशाबाहेर संपत्ती जमवली आहे कां ते तपासायचं असल्याचेही सरकारी वकिलांनी सांगितले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराडचा तपासही करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.