बीड | Beed
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने वाल्मीक कराडभोवती फास आवळला आहे. आज सीआयडीने बीडच्या विशेष कोर्टात १५०० पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रातून सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमांईड असल्याचे म्हटले आहे. खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असे सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे-जे मोर्चे निघाले, आंदोलन झाली त्यावेळी विविध नेत्यांनी, ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते. आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टरमाइंड आहे.
सीआयडीकडे संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ
दाखल केलेल्या आरोपपत्रात विष्णू साठे दोन नंबरचा आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणीच्या वादातून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झाले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादात संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. २९ नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मीक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे आहे.
आरोपी वाल्मीक कराड यानेच संतोष देशमुखांच्या हत्येचे प्लॅनिंग केले. यानंतर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी संतोष देशमुखांचा निर्घृण खून केला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच होता, असे आरोप पत्रात म्हटले आहे. मात्र या आरोप पत्रातून दोन आरोपींचे नाव वगळण्यात आले आहे.
रणजीत मुळे हा ॲट्रोसिटी प्रकरणातील आरोपी होता. तर सिद्धार्थ सोनवणे हा खूनाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र दोघांविरोधात आरोप पत्र दाखल झाले नाही. दोघांची नावे सीआयडीने आरोप पत्रातून वगळली आहेत. आता पुरवणी आरोप पत्रात या दोघांची नावे येतात की त्यांना मुख्य आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनवले जाते? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
चार्जशिटमध्ये आरोपींचा कोणाचा कितवा नंबर
वाल्मिक कराड – एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले – तीन नंबर
प्रतीक घुले – चार नंबर
सुधीर सांगळे – पाच नंबर
महेश केदार – सहा नंबर
जयराम चाटे – सात नंबर
फरार कृष्णा आंधळे – आठ नंबर
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच आठवड्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यांनी सात मागण्या केलेल्या. त्यातील उज्वल निकम यांच्या नियुक्ती एक मागणी सरकारने मान्य केली. संतोष देशमुख प्रकरणात अजूनही समाधानकारक तपास होत नसल्याचे देशमुख कुटुंबियाचे म्हणणे आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा