Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना कोर्टाचा थेट दणका,...

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना कोर्टाचा थेट दणका, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?

बीड । Beed

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या खटल्याची कायदेशीर लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, बीड येथील विशेष ‘मकोका’ (MCOCA) न्यायालयात मंगळवारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याच्यासह सर्व आरोपींना कडक शब्दांत फटकारले असून, त्यांच्यावर दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पार पाडली आहे.

- Advertisement -

सुनावणी सुरू होताच आरोपींच्या वतीने खटला लांबवण्यासाठी विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. आरोपी क्रमांक ४, प्रतीक घुले याने शेवटच्या क्षणी आपले वकील बदलल्याची माहिती न्यायालयाला दिली. नवीन वकिलांनी पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला, तसेच लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटा आणि इतर अहवालांच्या प्रती अद्याप मिळाल्या नसल्याचे कारण पुढे केले. आरोपींच्या या भूमिकेवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

YouTube video player

उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “आरोपी जाणीवपूर्वक हा खटला ‘डी फॉर डिले’ (विलंब) आणि ‘डी फॉर डिरेल’ (रुळावरून घसरवणे) करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार वकील बदलणे आणि पुराव्यांच्या प्रतींसाठी तांत्रिक कारणे देणे, हा केवळ न्यायालयीन प्रक्रियेचा वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे.”

आरोपींच्या या वागणुकीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. “प्रत्येक तारखेला असेच प्रकार घडायला नकोत. वारंवार तीच ती कारणे देऊन खटला लांबवला जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही,” अशा कडक शब्दांत न्यायालयाने आरोपींना सुनावले. लॅपटॉपमधील डेटाबाबत न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजच्या आज सर्व डेटा तपासून घ्यावा. ‘एआय’च्या (AI) युगात पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असा दावा करत वेळ मागणाऱ्या आरोपींच्या वकिलांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.

या सुनावणीतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे जेव्हा न्यायालयाने सर्व आरोपींना पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर असलेले गंभीर आरोप वाचून दाखवले. “तुमच्यावर खंडणी, अपहरण, निर्घृण हत्या आणि ‘मकोका’ अंतर्गत संघटित गुन्हेगारी केल्याचे गंभीर आरोप आहेत, हे तुम्हाला मान्य आहेत का?” असा थेट प्रश्न न्यायालयाने विचारला.

यावर मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने अत्यंत ठामपणे “मला हे आरोप अमान्य आहेत” असे उत्तर दिले. कराड याने न्यायालयात अधिक बोलण्याचा प्रयत्न केला असता, न्यायालयाने त्याला “फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या” असे बजावले. वाल्मीक कराडसह इतर सर्व आरोपींनीही स्वतःवर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सरकारी पक्षाच्या मते, संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ वैयक्तिक वादातून झालेली नसून, खंडणी मिळवण्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी केलेली एक संघटित गुन्हेगारी आहे. आरोपींना स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करून परिसरात दहशत पसरवायची होती. या संघटित गुन्हेगारीमुळेच या प्रकरणात ‘मकोका’ लावण्यात आला आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आता पुराव्यांचे काम लवकरच सुरू होईल. ८ जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीनंतर हा खटला पूर्णपणे ‘फास्ट ट्रॅक’वर चालवला जाईल. यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, लॅपटॉपमध्ये काही खाजगी आणि संवेदनशील माहिती असल्याने त्याचा गैरवापर टाळण्यासाठी तो सरसकट खुला करता येणार नाही, मात्र न्यायालयीन नियमानुसार आवश्यक तो डेटा वकिलांना उपलब्ध करून दिला जाईल. या खटल्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...