मुंबई | Mumbai
बीडच्या (Beed) केज तालुक्यातील (Kej Taluka) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण झाले होते. यानंतर पुढील काही तास त्यांना मारहाण सुरु होती. तर संध्याकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह (Dead Body) सापडला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. तसेच याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
यानंतर याप्रकरणी सीआयडीकडून (CID) कसून चौकशी सुरु आहे, सीआयडीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राद्वारे अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांची रेखाचित्रं समोर आली आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी १४०० ते १८०० पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) तयार करण्यात आले आहे. यातच या हत्याचारांचा तपशील नमूद करण्यात आला आहे.
सीआयडीच्या आरोपपत्रात ५ हत्यारांचा उल्लेख असून त्यामध्ये पाईप, वायर लावलेली मूठ, गज, लाकडी दांडा यांचा वापर देशमुखांना मारहाण करताना केला गेल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुखांना मारण्यासाठी मारेकऱ्यांनी विशेष हत्यारं तयार केली होती, असा उल्लेख आरोपपत्रात आहे. देशमुखांना मारेकऱ्यांनी (Killers) पांढरा पाईप, तपकिरी रंगाच्या गॅस पाईपनं अमानुषपणे मारहाण केली. तसेच लाकडी दांडा, तारा लावलेली एक वायरदेखील मारण्यासाठी वापरण्यात आली. तर देशमुखांना मारताना आपल्याला इजा होऊ नये यासाठी त्या वायरला एक मूठ बसवण्यात आली होती. ही सगळी शस्त्रं जप्त करण्यात आलेली आहेत.
तसेच संतोष देशमुख यांना मारहाण करताना मारेकऱ्यांनी पाईपचा वापर केला होता. यावेळी देशमुख यांना मारहाण करताना या पाईपचे १५ तुकडे झाले होते. त्यानंतर या पाईपचे १५ तुकडे सीआयडीने जप्त केले होते. तसेच या पाईपच्या (Pipe) १५ तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात देण्यात आला होता. यानंतर आता या शस्त्रांचा फोटो समोर आला असून यात लोखंडी रॉड, पाईप आणि गॅस पाईप अशा शस्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह (Walmik Karad) त्याच्या साथीदारांचा हत्येतील सहभाग स्पष्ट झाला आहे. कराडने आवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यासाठी त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावले होते. याच खंडणी (Extortion) प्रकरणातून देशमुखांची हत्या झाली.