बीड । Beed
मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप निश्चितीनंतर केज न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली. दरम्यान, या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांसोबत निलंबित पोलिसांनी होळी खेळल्याची छायाचित्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केली आहेत.
काय म्हटलंय अंजली दमानियांनी?
हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे,
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत.
पण कोणाबरोबर ?
संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधिश सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निलबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना, जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.
अंजली दमानिया यांनी पुढे म्हटले की, न्यायाधीशांकडे न्यायिक कार्यालयाची प्रतिष्ठा राखणे, निष्पक्षता राखणे आणि न्यायिक जीवनाच्या मूल्यांची पुनर्रचना इतर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे निष्पक्ष कारवाई सुनिश्चित करणे हे अपेक्षित आहे. न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी १२ मार्च रोजी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते. आरोपी वाल्मिक कराडची बाजू वकील विकास खाडे यांनी मांडली. तसेच, सरकारी पक्षातर्फे बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला. काही कारणास्तव प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीस हजर राहू शकले नाहीत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या या प्रकरणात सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वीही वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत आवाज उठवला आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेही त्या चर्चेत राहिल्या आहेत. या नव्या खुलास्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे, तसेच न्यायालय यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.