Thursday, July 4, 2024
Homeक्राईमसराफ दुकानात आला, नजर चुकवून साडेतीन लाखांचे सोने घेऊन गेला

सराफ दुकानात आला, नजर चुकवून साडेतीन लाखांचे सोने घेऊन गेला

बालिकाश्रम रस्त्यावरील घटना || तोफखाना पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सराफ दुकानात आलेल्या चोरट्याने सराफ व्यावसायिकाची नजर चुकवून तीन लाख 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सदरची घटना रविवारी (30 जून) सकाळी पावणे दहाच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळ्यातील दहिवळ ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत भगवान दहिवळ (वय 62 रा. सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे सुडके मळ्यात दहिवळ ज्वेलर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. ते दररोज सकाळी 10 वाजेच्या सुमारास दुकान उघडतात व रात्री साडेआठच्या सुमारास बंद करतात.

ते रविवारी पावणे दहाच्या सुमारास घरातील दुकानात ठेवण्याकरिता सोन्याच्या दागिन्यांची बॅग घेऊन गेले व बॅगेतील सोन्याचे दागिने दुकानात लावत असताना एक अनोळखी व्यक्ती डोक्यात हेल्मेट घालून दुकानात आला. तो शशिकांत यांना सोन्याचे दागिने दाखवा असे म्हणाला असता त्यांनी दागिने दाखवण्यासाठी प्लास्टिकचा डबा टेबलावर ठेवला व त्यामधील सोन्याचे दागिने दाखवत असताना त्याने आणखी सोन्याच्या वस्तू मागितल्या. शशिकांत यांनी त्याला दुसरा डबा दाखविला. दरम्यान, तो व्यक्ती काही एक न बोलता व खरेदी न करता तेथून निघून गेला.

शशिकांत यांना शंका आली असता त्यांनी सोन्याच्या प्लास्टिकच्या डब्याची पाहणी केली. त्यामध्ये 62 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठणाचे पाच नग, 14.800 ग्रॅमचे एक सोन्याचे नेक्लेस, सात ग्रॅमचे सोन्याचे पॅन्डलचे दोन नग, तीन ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, 20 ग्रॅमचे चार सोन्याचे वेलांचे जोड व 15 ग्रॅमच्या 12 सोन्याच्या बुगड्यांचे जोड असा एकुण तीन लाख 48 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या