Monday, May 27, 2024
Homeनगरसरणावरच धानोरेत आमरण उपोषण

सरणावरच धानोरेत आमरण उपोषण

सात्रळ, राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

प्रवरा नदीपात्रातून सुमारे 74 लाखांची वाळू चोरीला जाते. त्याविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याचा पंचनामा केला जातो.

- Advertisement -

संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळते. मात्र, वर्ष उलटले तरी वाळू तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे राहुरी महसूल प्रशासनाच्या संशयातीत कारभाराला कंटाळून अखेर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘हे राम’ म्हणत स्मशानभूमीतच सरण रचून त्यावर बसून राहुरी तालुक्यातील धानोरे येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले.

जोपर्यंत या वाळूचोरी प्रकरणातील दोषी महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्मशानातील बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

प्रवरा नदीपात्रातून गेल्या काही वर्षांपासून खुलेआम अनधिकृत वाळू उपसा होत असताना महसूल प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने धानोरे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान दिघे आणि आदिनाथ दिघे यांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी हे राम म्हणत स्मशानात लाकडे व सरपण रचून त्यावरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

याच वाळूप्रकरणी गेल्यावर्षी बापू दिघे यांनी उपोषण केले असता महसूलच्या अधिकार्‍यांनी नदीपात्रातील चोरीस गेलेल्या वाळूचा पंचनामा केला होता. त्यात सुमारे 74 लाखांची वाळू चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी संबंधित वाळू तस्कर व महसूल कर्मचार्‍यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन राहुरीच्या तहसीलदारांनी दिले होते.

मात्र, वर्ष उलटूनही अद्याप कोणावरही कारवाई केली नाही. उडवाउडवीची उत्तरे देत हे वाळू प्रकरण दडपण्याचे काम महसूलचे अधिकारी करू लागल्याने अखेर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

वर्षभर आम्ही या वाळू चोरी विरोधात महसूल विभागातील खालपासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई होत नाही. उलट दोषी अधिकारी व वाळू तस्करांना पाठीशी घालण्याचे काम महसूलचे अधिकारी करीत असल्याने आम्ही न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत दोषींवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढ़ा सुरूच राहील.

– सूर्यभान दिघे (उपोषणकर्ते)

अनधिकृतपणे अमर्याद वाळू उपशामुळे संपूर्ण प्रवरा नदीपात्र उजाड़ होत चालले आहे. महसुलच्या अधिकार्‍यांचे हात या अवैध वाळू उपशात ओले होत असल्याने त्यांचा वाळू तस्करांना आशिर्वाद असल्याचे उघड़ झाले असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास कोणीही धजावत नाही. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात आम्हाला न्यायासाठी स्मशानात उपोषणास बसावे लागत असून आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढ़ा सुरू ठेवणार आहोत.

– आदिनाथ दिघे (उपोषणकर्ते)

ग्रामस्थांची नाराजी

धानोरे येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी पाठ फिरविली असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या