Saturday, July 27, 2024
Homeनगरऔरंगजेबाचे फलक झळकावणारा सरफराज दोन वर्षांसाठी हद्दपार

औरंगजेबाचे फलक झळकावणारा सरफराज दोन वर्षांसाठी हद्दपार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील फकीरवाडा परिसरात निघालेल्या सदंल उरूस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक झळकावणारा सरफराज मोहंमद इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. मुकुंदनगर) याला दोन वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी (नगर भाग) सुधीर पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

सदंल उरूस मिरवणुकीमध्ये चौघांनी संगनमताने औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करून आक्षेपार्ह घोषणाबाजी करून दोन समाजांत जातीय तेढ निर्माण होऊन, द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी सर्फराज जहागिरदार याच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटले होते. या कृती विरोधात संताप व्यक्त करत कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती.

या घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी सर्फराज जहागीरदार याच्या विरूध्द उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्याकडे हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. यावर उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांनी सर्फराज याला दोन वर्षांकरिता नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश प्राप्त होताच सहा. पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस अंमलदार कैलास सोनार, संदीप घोडके, रेवननाथ दहीफळे, दीपक शिंदे, अमोल आव्हाड, समीर शेख यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत सर्फराज याला जिल्ह्याच्या हद्दीबाहेर नेऊन सोडले आहे.

एमआयडीसीतील गुन्हेगार हद्दपार

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गोरख गजाबापू कारंडे (रा. देहरे ता. नगर) यालाही नगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. कारंडे विरोधात मारहाण, जिवे मारण्याची धमकी, अत्याचार, विनयभंग, जबरी चोरी, रस्तालूट आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या