Friday, May 31, 2024
Homeनगरसरपंचपदाच्या आरक्षणामुळे पिंपरी निर्मळ निवडणुकीत मरगळ

सरपंचपदाच्या आरक्षणामुळे पिंपरी निर्मळ निवडणुकीत मरगळ

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या पंधरा तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून दुष्काळी परिस्थिती व सरपंच पदाचे आरक्षण असल्याने सदस्य पदाचे उमेदवार शोधताना गाव पातळीवरील नेत्यांची दमछाक होत असतानाचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisement -

मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे व न पडताच परतीचा मान्सूनही रित्या हाती गेल्यामुळे पिंपरी निर्मळ परिसरात प्रचंड दुष्काळाची दहाकता जाणवत आहे. सोयाबीन पिके हातची गेली आहेत.पावसाअभावी रब्बीचा ही भरवसा नाही.पशुधनाच्या चार्‍याचाही प्रश्न प्रचंड बिकट झालेला आहे.त्यातच ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेली आहे. सरपंच पद महिला मागासवर्गीयसाठी राखीव निघाले आहे. सरपंच पदाचे आरक्षण राखीव निघाल्याने उत्साही गावपुढार्‍यांचा आधीच हिरमोड झाला होता. सर्वसामान्य जनतेमधून निवडणुकीसाठी फारसी उत्सुकता दिसत नव्हती. आरक्षण व भिषण दुष्काळाची दाहकता जाणवत असल्याने सदस्य पदासाठी स्थानिक नेत्यांना उमेदवार शोधताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरावयाचा असल्यास ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व नळपट्टी या थकबाक्या भराव्या लागतात. निवडणुकीचे डिपॉझिट बँक खाते प्रतिज्ञापत्राचा खर्च व निवडणुकीसाठीचा प्रत्यक्ष खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता हा वायफळ खर्च करणे सर्वसामान्य नागरिकांना शक्य होत नाही.अशा परिस्थितीत निवडणूक जाहीर झाल्याने गावातील तीनही गटाच्या नेत्यांनी आपापले पॅनल तयार करण्यासाठी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. मात्र संभाव्य खर्च दुष्काळी परिस्थिती व सरपंच पदाचे आरक्षण यामुळे सर्वसामान्य जनतेमधून निवडणुकी संदर्भात उत्सुकता दिसून येत नाही. उमेदवार न मिळाल्यास पॅनल अपुरा होण्याच्या धास्तीने गाव पुढार्‍यांवर उमेदवार शोधण्यासाठी प्रचंड पळापळ करण्याची वेळ येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या