अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एका ठेकेदाराकडून ग्रामपंचायतच्या दाखल्यासाठी एक लाख रूपयांची लाच मागणार्या सरपंचाच्या मुलाला 25 हजार रूपये स्वीकारताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मकरंद गोरखनाथ हिंगे (वय 40 रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी (2 एप्रिल) सायंकाळी बुरूडगाव रस्त्यावरील अहिंसा चौकात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे सहकारी संस्थेचे सभासद असून ठेकेदारीचा व्यवसाय करतात. त्यांना वाळुंज ग्रामपंचायतच्या हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे टेंडर सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे 10 लाख रूपयांचे बिल शासनाकडून मंजूर करण्यात आले.
मात्र, त्यासाठी आवश्यक ग्रामपंचायतीच्या पूर्णत्व दाखल्यावर सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक होती. हा दाखला मिळवून देण्यासाठी सरपंचाचा मुलगा मकरंद हिंगे याने सरपंचाची सही घेण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी मकरंद हिंगे याने एक लाख रूपयांची मागणी करत तडजोडीनंतर 45 हजार रुपयांवर रक्कम निश्चित केली. पहिल्या हप्त्यापोटी 25 हजार रुपये स्वीकारण्यास तो तयार होता. त्यानुसार, सापळा रचण्यात आला. मकरंदने तक्रारदाराकडून 25 हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.