Wednesday, May 22, 2024
Homeनगरभगवद् गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल

भगवद् गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल

सरसंघचालक मोहन भागवत : लाभाच्या गोष्टींना महत्त्व न देता कर्म करा

संगमनेर (प्रतिनिधी)- मोह, आशा, अपेक्षा, आकांक्षा, अहंकारापासून दूर राहिले पाहिजे. याच कारणामुळे आपण मुख्य उद्देशापासून दूर जातो. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करत रहा, भगवद् गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. दरम्यान, यावेळी 35 हजार विद्यार्थ्यांनी भगवद् गीतेतील कंठस्थ केलेला 12 वा व 15 वा अध्यायाचे पठण केले. हा एकप्रकारे नवा विक्रम ठरला आहे.

- Advertisement -

संगमनेर येथे जाणता राजा मैदानावर पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या 71 व्या जन्मवर्षानिमित्ताने गीता परिवाराच्यावतीने आयोेजित गीता महोत्सवात ते बोेलत होते. या कार्यक्रमात 71 हजार गीतेचे मुखोद्त अध्याय गोविंददेव गिरी महाराज यांना भेट देण्यात आले. यावेळी योेगगुरू रामदेव बाबा, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शाम जाजू, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, ललितादेवी मालपाणी, सुवर्णाताई मालपाणी, उद्योगपती राजेश मालपाणी, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, मनिष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिश मालपाणी उपस्थित होते.

प्रारंभी श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. तर डॉ. संजय मालपाणी यांनी संपूर्ण गीता कंठस्थ केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहन भागवत म्हणाले, गीता परिवाराच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य होत आहे. गीतेतील ज्ञान प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे याचा वस्तुपाठ म्हणजे भगवद्गीता आहे. मात्र लोेभापोटी आपण मूळ उद्देशापासून दूर जातो. लाभांच्या गोष्टींना महत्त्व देतो. ते न करता आपले कर्तव्य आपण केले पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करत रहा. गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरु बनेल असेही ते म्हणाले.

रामदेवबाबा म्हणाले, ज्ञानापेक्षा कोणीही मोठे नाही. तेव्हा ज्ञान मिळवा. परमेश्वराला सर्व समान आहे. आपल्यातील शक्ती जागृत करा. आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई अशा समस्या आहेत. मात्र केवळ समस्यांवर विचार करत बसून नका. आज कांद्याचे भाव वाढत असून लोक पंतप्रधान मोदी यांना कांद्याचे भाव कमी करा असे म्हणतात, आता मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का? असा प्रतिसवाल करुन ते म्हणाले, आपण आपले कर्तव्य करुन स्वत:ला सिध्द करा. दुसर्‍यांचे भाग्य बनविणारे बना. गीता कंठस्थ करणारी तुम्ही मुलं कधीही दुराचारी होणार नाही याचा आत्मविश्वास वाटतो. मी सर्वसामान्य कुटूंबात जन्माला आलोे, आणि सर्वसामान्य कुटूंबातील लोकांनीच प्रगती केली आहेे. माझ्या शिक्षणासाठी केवळ 500 रुपये खर्च झाला आहेे. आज मी तुमच्या समोेर उभा आहे. तुम्ही असं काम करा की, सर्व जग तुमच्या पाठीमागे फिरेल असे काम तुम्हाला करायचे आहे. आज अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहे. देशात हिंसा वाढली आहे. पण हे थांबविण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय आहे. हे संस्कार गीता परिवाराच्या माध्यमातून मिळताहेत ही अभिमानास्पद बाब आहे असे सांगत त्यांनी व्यासपीठावर योगाचे धडे दिले.

गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, आजची शिक्षण व्यवस्था बिघडल्यासारखी वाटते. तिच्यात बदल करण्याची गरज आहे. योग्य वयातच मुलांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. योग्य शिक्षणासाठी भगवद्गीता वाचावी लागेल. त्यांच्या डोक्यात ती गेली पाहिजे, कंठस्थ झाली पाहिजे. राष्ट्रप्रेम, राष्ट्र धर्म त्यातूनच निर्माण होेईल. ‘विद्या धर्मेण शोेभते’ हे बोेध वाक्य घेवून गीता परिवार मार्गक्रमण करत आहे. गीता वाचली जाईल. तिचे आचरण केले जाईल असे सांगून ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतंजली हे धर्माच्या मार्गावर पुढे गेले. त्यापाठोपाठ गीता परिवार मार्गक्रमण करत आहे. देशाची मुळ ऊर्जा जिवंत ठेवली पाहिजेे. तरच देशाची महानता वाढेल.

प्रास्ताविकातून कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितले की, 33 वर्षापूर्वी गीता परिवाराची सुरूवात संगमनेरात झाली. आजच्या कार्यक्रमाला आठ राज्यातून 185 शाळांमधून 35 हजार विद्यार्थी उपस्थित राहिले. 81 विद्यार्थ्यांनी पूर्ण गीता कंठस्थ केली तर 35 हजार विद्यार्थ्यांनी भगवद् गीतेतील कंठस्थ केलेला 12 वा व 15 वा अध्याय कार्यक्रमस्थळी म्हणून दाखविला. यावेळी संपूर्ण गीता कंठस्थ केलेल्या 81 विद्यार्थ्यांना ‘गीताव्रती’ ही उपाधी व सुवर्णपदक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या