Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगसाक्षात्कार...उठतात कधीकधी जीवघेण्या कळा

साक्षात्कार…उठतात कधीकधी जीवघेण्या कळा

अर्ध्या चतकोरात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा संसार दृष्ट लागण्यासारखा फुलत गेला. आम्हा तिघा बहिण-भावंडांना वाढवताना त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. हालअपेष्टा सहन केल्या. आर्थिक बाजू कमकुवत असतानाही उच्च शिक्षणाचे दरवाजे आमच्यासाठी खुले केले. आण्णांची काही स्वप्नं होती.

आमच्याकडून काही अपेक्षा होत्या. पण त्या त्यांनी उघडपणे कधी बोलून दाखवल्या नाहीत. मनातल्या मनात ते त्याची उजळणी करीत रहायचे. आणि हळूच कधीतरी आक्काजवळ त्याचा उच्चार करायचे. ते मितभाषी होते. स्पष्टपणे कधी बोलत नसत. त्यामुळे त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नसे. ते रागवत परंतु आतल्या आत धुमसत.

- Advertisement -

हात उगारीत परंतु मारत नसत. ते शिस्तप्रिय होते. खूप आनंदी असणारे आण्णा माझ्यातरी आठवणीत नाहीत. चिंतेच्या काळ्याकुट्ट ढगांनी त्यांच्या मनाचं आभाळ नेहमीच झाकोळलेलं असे. कितीतरी गोष्टी त्यांच्या अंतःकरणात तशाच दबून राहिल्या. त्या उघडपणे त्यांनी कधीच बोलून दाखवल्या नाहीत. त्यांचं स्वतःचं असं एक जग होतं. त्या जगात आमच्या व्यतिरिक्त बाहेरची खूप थोडी माणसे होती. नातेवाईकांशी असणारा संपर्क यथातथाच होता. मित्रांच्या गोतावळ्यात ते फार रमत नसत. चारचौघात असले तरी ते वेगळे दिसत. त्यांच्या स्वतःच्या विश्वात रममाण व्हायला त्यांना आवडत असे. निर्विकारपणे, निरलसपणे शुन्यात नजर लावून बसलेले आण्णाच मला जास्त आठवतात.

सिन्नरहून घोटी इगतपुरीकडे जाताना घोरवड घाट लागतो. तो घाट उतरून गेलं की दक्षिणेला डोंगरांनी वेढलेलं शिवडे गाव दिसायला लागतं. तेच आमचं मूळ गाव. तिथेच आण्णांचा जन्म झाला. डोंगराच्या पोटातच थोडी शेतीवाडी होती. गावाला शिक्षणाचा फारसा गंध नव्हता. थोडीशी अक्षरओळख, व्यवहारापुरतं अंकज्ञान मिळालं की शाळा बंद आणि रवानगी थेट जनावरांच्या पाठीमागे. शेती हा मुख्य व्यवसाय.

निसर्गाशी दोन हात करता करता कष्टातच आयुष्य संपून जाई. शिक्षणाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर आण्णांनाही डोंगराचीच वाट धरावी लागली. परंतु जनावरांच्या राखोळीत ते रमले नाहीत. शिक्षणाविषयीची आस्था त्यांच्या मनात खोलवर रूजलेली होती. आण्णांचं त्यांच्या वडलांशी फारसं पटत नसे. आईशी मात्र नित्य संवाद होता आणि नितांत प्रेम होतं. त्या डोंगरदऱ्यात आयुष्य असंच संपून जाणं त्यांना मान्य नव्हतं. कुणालाच न सांगता एके दिवशी त्यांनी घर सोडलं. थेट नाशिक गाठलं. त्या नकळत्या वयात मिळेल ते काम करून प्रसंगी उपाशी राहून ते शिक्षणाची वाट चालत राहिले.

ज्या घराच्या ओसरीत त्यांना आसरा मिळाला त्या घरानेच त्यांना मायेचा उबाराही दिला. आण्णा नेटाने शिकत राहिले. ठावठिकाणा समजल्यावर त्यांची आई त्यांच्याजवळ जाऊन राहिली. तिने धुणीभांडी केली, रस्ते झाडले. पोटाला चिमटा काढून मायलेक लढत राहिले. आण्णांना परिस्थितीची जाणीव होती.

आईच्या कष्टाचं मोल त्यांना माहित होतं. ते मातीमोल होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. मट्रीकनंतर नोकरीसाठी त्यांना बोलावणं आलं. अकोले तालुक्यातल्या मवेशीच्या डोंगरात प्राथमिक शिक्षक म्हणून ते रूजू झाले. शिवड्याच्या भाषेत ते शाळामास्तर झाले. नंतर आम्हालाही पुढे लक्ष्मण मास्तरचं प्वॉर हे बिरूद कायमचं चिकटलं. त्यातून गावाला आण्णांविषयी वाटणारा अभिमान ओसंडून वाहताना आम्ही अनेकवेळा अनुभवला आहे.

नोकरीच्या सुरवातीच्या काळात वेगवेगळ्या गावांना वळसा घालत आण्णा आणि आक्का शिर्डीला येऊन स्थिर झाले. माझ्या मोठ्या बहिणीचं शिक्षण आणि लग्न, माझं शिक्षण आणि नोकरी तसेच छोट्या भावाचं शिक्षण या रणधुमाळीत दिवस कापरासारखे उडून गेले. आयुष्याची अर्धीअधिक लढाई लढून झाल्यानंतर आता कुठे स्थैर्य यायला लागलं होतं. कमी पगाराची परंतु मला नोकरी मिळाली होती. मोठी बहीण तिच्या संसारात सुखी आणि समाधानी होती. लहान भाऊ पुढील शिक्षणात मग्न होता.

अचानक एके दिवशी आण्णा शाळेतून लवकर घरी आले. एकाएकी त्यांची दृष्टी खूप कमजोर झाली होती. दहा फुटांच्या पुढचा उजेड त्यांना दिसत नव्हता. मनातून ते खूप घाबरले होते. आक्का त्यांना घेऊन नेत्रतज्ञांकडे गेली. डोळ्यांना काहीच इजा झालेली नव्हती. डोळे व्यवस्थित होते. तरीही हा कमालीचा दृष्टिदोष! डॉक्टरांना वेगळीच शंका आली. त्यांनी मेंदूविकार तज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. मनाची धाकधूक आणखीनच वाढली. तशा परिस्थितीत आक्का त्यांना घेऊन पुण्यात रूबी हॉलला गेली.

सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. चारूदत्त आपटे यांनी आण्णांच्या पाठीवर हात ठेऊन जे सांगितले त्याने आमच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. ब्रेन ट्यूमर. अ़ॉपरेशन करून गाठ काढावी लागेल. उशीर केला तर कायमचं अंधत्व! अ़ॉपरेशन दरम्यान जेवढी दृष्टी असेल ती टिकून राहण्याचा संभव. सगळेच हवालदिल झालो. आक्कानेच पुढाकार घेतला. आण्णा गर्भगळीत. त्यांच्या मनाची तयारी आक्कानेच केली.

पाच सहा तास चाललेल्या अ़ॉपरेशनमधून ते सुखरूप बाहेर आले. घरी परतल्यावर अंधुक नजरेने जगाला न्याहाळण्याऐवजी ते डोळे मिटूनच बसू लागले. आपल्याला आता पूर्वीसारखं स्वच्छ दिसणार नाही याचं शल्य त्यांना टोचत असे. वर्तमानपत्रांचं वाचन संपलं. टीव्हीकडे त्यांनी पाठ फिरवली. अगोदरच मितभाषी असणारे आण्णा अधिकच अबोल झाले. मेंदू अ़ॉपरेट केलेला असल्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा संवेदना बधीर झालेल्या होत्या. अचानक त्यांचं डोकं प्रचंड ठणके. शरीरभर वेदनांचा प्रवाह पसरत जाई. नैराश्याने त्यांना पुरतं ग्रासलं होतं. ते असंबद्ध बोलू लागत.

दिवसेंदिवस आण्णांचा आजार बळावत गेला. सगळं घर जणू आजारी झालं. आम्ही त्रासायचो, वैतागायचो. अशाही परिस्थितीत शांत होती ती आक्का. तिने कधीच त्रागा केला नाही. मी फटकळपणे काहीबाही बोलून जायचो. एके दिवशी दाढेखालून तिव्र कळा सुरू झाल्यावर रात्रभर तळमळत होतो. डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या आणि अक्कलदाढ उगवत असल्याचे सांगितले. ‘साक्षात्कार’ झाल्यासारखा घरी आलो.

आण्णा डोळे मिटून पडलेले. कण्हत होते. पहिल्यांदाच त्यांची वेदना मला माझी वेदना वाटली. डोळ्यातून झरणाऱ्या सांत्वनाच्या द्रावणात त्यांच्या कण्हण्याचा खडा किती अलगदपणे विरघळून गेला समजलेच नाही.आण्णांसाठी लिहिलेली ‘साक्षात्कार’ कविता राम शेवडीकरांच्या ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी अंकाचं संपादन केलं होतं. आण्णांच्या हयातीत लिहिलेली ही कविता त्यांना त्यांच्या अंधत्वामुळे वाचता आली नाही आणि त्यांना वाचून दाखवण्याचा प्रयत्नही मी कधी केला नाही. या शल्याची टोचणी मला आजही सतावते आहे.

साक्षात्कार

मेंदूवरील गाठ काढल्यानंतरही विकलांग झालेले वडील

आणि वारंवार उद्भवणाऱ्या खोकल्याने त्रस्त झालेली आई

घरात सुखाने नांदतो आहे आजार.

आम्ही दुःखाच्या दावणीला बांधलेल्या जनावरागत

‘त्या’ने फेकलेल्या शुष्क दिवसांचा कडबा चघळीत.

या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी

पाहून झाले डॉक्टर, करून झाल्या वाऱ्या

सांगून झाले देवऋषी, बाहेरचेही बघून झाले

परंतु उपाय शुन्य.

निरूपायाने आकाशाकडे पाहत

वडील करतात निर्वाणीची भाषा

मी संतापाने काही काही बोलून जातो

नंतर मग मलाच माझी वाटू लागते लाज.

वेदनांचा कहर झाल्यावर

वडलांच्या अर्ध्या शरीरभर

सळसळू लागते ठसठसणारी वीज

उठताना, बसताना, झोपताना आणि जेवतानाही

उठतात कधीकधी जीवघेण्या कळा

हातातला घास हातात, तोंडातला तोंडात

वडील कण्हत राहतात

आई खोकल्याची उबळ दाबत

फिरवत राहते त्यांच्या पाठीवरून हात.

भाऊ अस्वस्थ

बायको आणि भावजय खालमानेने सुरू ठेवतात जेवण

मी लपवू शकत नाही माझ्या निर्दयी मनातून उमटलेली

आणि चेहऱ्यावर पसरत जाणारी तिरस्काराची रेषा !

मी धुसपुसत राहतो वेळकाढू अवस्थेत.

परवा अचानक दाढेखालून मला सुरू झाल्या जीवघेण्या कळा

जेवण बाजूलाच, जबडा उघडणेही मुश्किल झाले

रात्र तळमळत या कुशीवरून त्या कुशीवर ढकलली

डॉक्टरांनी तपासून गोळ्या वगैरे दिल्या

आणि अक्कलदाढ उगवत असल्याचे सांगून टाकले

आतून काहीतरी उगवल्याप्रमाणे

साक्षात्कार झाल्यासारखा मी घरी परतलो

वेदनांनी व्याकुळ झालेल्या वडलांच्या चेहऱ्यामागच्या कळा

मला स्पष्टपणे दिसू लागल्या…

माझ्या सांत्वनाच्या द्रावणात त्यांच्या कण्हण्याचा खडा

केव्हा विरघळून गेला समजलेच नाही.

– शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या