देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata
सातारा जिल्ह्यात दोन खून करून आरोपी जालन्याला पळून जात असल्याची माहिती सातारा पोलिसांनी नेवासा पोलीस ठाण्याला दिल्यानंतर नेवासा पोलिसांनी खडका फाटा येथील टोलनाक्यावर या आरोपीस जेरबंद केले.
याबाबत माहिती अशी की, 16 जुलै 2023 रोजी मेढा, ता. जावळी जि. सातारा येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जावळी येथील धबधब्याजवळ अनोळखी दोन इसमांनी अक्षय शामराव अंबवले रा. बसाप्पाची वाडी व गणेश अंकुश फडतरे रा. करंजे ता. जि. सातारा या दोन्ही इसमांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धबधब्याच्या दरीत ढकलून देऊन त्यांचा खून केला होता. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात (जि. सातारा) गु.र.नं 114/2023 भा.दं.वि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील आरोपींची सातारा पोलिसांनी माहिती घेवून त्याबाबत तपास करून सदरच्या गुन्ह्यातील आरोपी साहील मेहबुब शेख रा. भिमाबाई आंबेडकरनगर, सदर बाजार सातारा हा एमएच 50-0736 या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकमध्ये बसून सातर्याकडून जालन्याकडे जात आहे अशी माहिती सातारा पोलिसांनी नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी पोलीस पथक पाठवून खडकाफाटा येथे नाकाबंदी करून मालवाहतूक करणार्या ट्रकची तपासणी सुरू केली असता, त्यादरम्यान एमएच 50- 0736 अशा क्रमांकाचा ट्रक आला असता, सदरचा ट्रक थांबवून त्यामधील इसमांना चेक करुन त्यामधील ड्रायव्हर व क्लिनर यांची विचारपूस केली त्यामधील ड्रायव्हर याने त्याचे नाव साहील मेहबूब शेख (वय 19) रा. भिमाबाई आंबेडकरनगर सदर बाजार सातारा असे सांगितले. त्यावरुन तोच आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना कळवून त्यास पोलीस स्टेशन नेवासा येथे आणून कायदेशीर कारवाई पूर्ण करून सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.