अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतकर्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारसदारांच्या नोंदी करणार आहे. याद्वारे मृत सातबारा ‘जिवंत’ करण्यात येणार आहे. ही मोहीम 1 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत राबविली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात या योजनेला यश मिळाले त्याची दखल सरकारने घेऊन अहिल्यानगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसदारांमध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
वारसदारांची संख्या अधिक असल्यास सामोपचाराने वाटप होऊ शकले नाही. या एकमेव कारणामुळे राज्यातील शेकडो एकर शेतजमीन मृत शेतकर्यांच्या नावावर आहे.वारसदारांची संख्या वर्षानुवर्षे वाढत गेल्यामुळे वारस नोंदणी प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत आहेत, तर दीर्घ प्रक्रियेमुळे अनेक प्रकरणे रखडलेली आहेत. याचा फटका शेतकर्यांचे वारसदार आणि शासकीय उद्देशाला बसत आहे. सातबारा अपडेट नसल्यामुळे शेतकर्यांना पंतप्रधान किसान पीककर्ज योजना, पीक विमा, आणि विविध कृषी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मृत शेतकर्यांच्या नावावर जमीन असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ विद्यमान वारसदारांना मिळत नाही. राज्यातील शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मृत शेतकर्यांच्या वारसदारांच्या नावावर नियमानुसार जमिनींची नोंदणी करणार आहे.
1 ते 21 एप्रिलपर्यंत संधी
1 ते 5 एप्रिल 2025 – ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणार्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे
6 ते 20 एप्रिल 2025- वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यूदाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख /स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील / सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक /भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे.
21 एप्रिल ते 10 मे 2025- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ.1966 च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन मंडल अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 दुरुस्त करावा जेणेकरुन सर्व जिवंत व्यक्ती 7/12 वर नोंदविलेल्या असतील.