कोल्हापूर | Kolhapur
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी कोल्हापूरमध्ये अभुतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले.काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. त्यांनी आपला निवडूक अर्ज मागे घेतला. यावेळी जे काही घडले ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. हा सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापूर्वी अर्धा तास अगोदर या घडामोडी घडल्या. या प्रकारानंतर सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला असला तरी मधुरिमाराजे यांची शेवटच्या क्षणी माघार घेण्याची खेळी त्यांच्या फारच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. यानंतर सतेज पाटील यांना त्यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयाबाहेर आपल्या समर्थकांसमोर बोलताना अक्षरश: रडू कोसळले
हे ही वाचा: Maharashtra Assembly Elections : जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला…; मधुरीमाराजे यांची माघार, सतेज पाटील भडकले
नेमके काय घडले?
कोल्हापूर उत्तर मधील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता त्या ठिकाणी काँग्रेसच्या पंजावर लढणारा उमेदवार रिंगणात नाही. ही गोष्ट सतेज पाटील यांच्या मनाला लागली. त्यामुळे सतेज पाटील यांना अजिंक्यतारापाशी आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना रडू आवरले नाही. सतेज पाटील इतके भावूक झाले होते की, त्यांना रडू आवरत नव्हते. शप्पत सांगतो की, जे काही का घडले, त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो की मला काहीही माहिती नाही की हे नेमकं का घडलं. का असं घडलं, कशासाठी माघार घेतली, याची मला कल्पना नाही. मी त्यांच्यावर काहीही चुकीचं बोलणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आहे. तो काही आता माघारी घेऊ शकणार नाही. पण आता जे समोर आहे, त्याला तुम्ही म्हणालात तर सामोरं जायचं… उद्यापर्यंत मला वेळ द्या. मलाही थोडा विचार करू द्या. मीही माणूस आहे. मलाही भावना आहे. जे घडलं. त्याबद्दल विचार करतो. उद्या म्हणजे आज आपण यावर निर्णय घेऊ, असे सतेज पाटील म्हणाले. एवढे बोलल्यानंतर सतेज पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बोलणे मुश्कील झाल्यामुळे ते पुन्हा खाली बसले. त्यावेळी आजुबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले.
मी गाडीतून येताना जाकीरला म्हटलं की मला माहिती नाही की काय होणार आहे. कारण मी अजूनपर्यंत रडलेलो नाही…. असे सतेज पाटील म्हणाले अन् त्यांना अश्रू अनावर झाले. मी कुणावरही टीका टिपण्णी करणार नाही. जे घडले त्याला सामोरे जायचे सामर्थ्य तुम्ही मला द्यावे, असे सतेज पाटील म्हणाले. याच वेळी बंटीसाहेब तुम आगे बढो हम तुम्हापरे साथ है, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा