कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर पाच शासकीय संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात सोमवारी कोल्हापूरमध्ये संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या संघर्ष मोर्चाला हजारोंची गर्दी होती. या मोर्चाला संबोधित करताना सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या दोन्ही नेत्यांच्या हट्टापायी सरकार पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा घाट महायुतीने घातल्याचे सतेज पाटील म्हणाले. तसेच मुश्रीफांनी केलेल्या जातीयवादाच्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीला कोरमची आवश्यकता नाही
१०० वर्षांपूर्वी कोल्हापुरात शाहू महाराजांनी सहकाराचा कायदा आणला. त्याच शाहूंच्या भूमीत आज सहकार पायदळी तुडवले जात आहे. हा संघर्ष मोर्चा केवळ कोल्हापूरचा राहिला नसून महाराष्ट्राचा बनला आहे, असे सतेज पाटील म्हणाले. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमाला कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे विरोधी १२ लोकांनी उद्या उपस्थित राहावे आणि चेअरमन निवड करावी, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
संघर्ष मोर्चातून विवेकानंद पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा; म्हणाले, तुमचा कोरम २०२९…
मुलगा पडलेला दिसला पण…
हसम मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडलेला दिसला, तसं त्यांनी चार वेळा बोलून दाखवलं. पण मातंग समाजाचे सुजीत मिणचेकर आणि मराठा समाजाचे युवराज पाटील पडले यावर मुश्रीफ काहीही बोलले नाहीत. मग खरे जातीयवादी कोण? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.
तुम्ही सोडून गेले, पण हा घाबरणारा पाटील नाही, मैदानात उतरून संघर्ष करणारा पाटील
तुम्ही मला सोडून गेले, बेहत्तर… मी निवडणूक लढलो आणि जिंकलोही… हा घाबरणारा पाटील नाही. हा मैदानात उतरणारा आणि संघर्ष करणारा पाटील आहे. राजू शेट्टींनी मला साथ दिली, गणपतराव पाटलांनी मला साथ दिली. सत्यजीत आबांनी मला साथ दिली. जिल्ह्यातील लोकांनी संघर्षाच्या काळात मला साथ देण्याची भूमिका घेतली. पलीकडच्या बाजूला दिग्गज माणसं होती. तीन मंत्री, दोन खासदार, दहा आमदार या सगळ्यांची फौज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी माणसांची फौज होती. मी पायाला भिंगरी लावून मी फिरलो. १२ तालुक्यांत २४ दिवस मी फिरलो, लोकांना भेटलो. २२ दिवस मी अँटी बायोटिक घेत होतो. मी स्वाभिमानीसाठी लढत होतो, तुम्ही तुमच्या पोराबाळांसाठी मतं मागत होता, असे सतेज पाटील म्हणाले.
सतेज पाटील म्हणाले, “आमचे सगळे उमेदवार हे कार्यकर्ते म्हणून उभे होते. ते निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केले तर मग जातीयवाद कसा केला असा प्रश्न पडतोय? मी जातवाद करणारा नाही, शाहू महाराजांच्या पायाजवळ आम्ही बसलो आहोत. निकाल लागल्यापासून मुश्रीफांनी फक्त माझा मुलगा पडला असं चार वेळा म्हटलं. परंतु मातंग समाजातील सुजीत मिणचेकर पडले, मराठा समाजातील युवराज पाटील पडले त्यावेळी मुश्रीफ साहेब काहीही बोलले नाहीत. हे जर मी बोललो तर चालेल का? पण मी असं म्हणत नाही. परंतु एका बाजूला माझ्यावर आरोप करता. मी गेल्या 25-30 वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळली, पण कधीही सत्तेच्या दारात गेलो नाही.”
सहकार संपवायच पाप या दोघांच
गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही माझ्या मांडीला मांडी लावून बसला, सत्तेमध्ये राहिलात आणि गोकुळची निवडणूक लढवली. त्यावेळी तुम्हाला गोकुळचं दार उघडलं नाही. पण बंटी पाटलांच्या हातानेच तुम्हाला गोकुळचं दार उघडलं. मी होतो म्हणून तुम्ही तिथे शिरलात हे लक्षात ठेवा, असं सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांना उद्देशून म्हटलं.
गोकुळमध्ये चार संचालक नेमण्याचा निर्णय झाला तो फक्त हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच झाला. सहकार संपवायचं हे या दोघांचं हे पाप आहे.




