मुंबई | Mumbai
मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढणार आहे. ‘सत्याचा मोर्चा’ असे या मोर्चाचे नामकरण करण्यात आलेय. या मोर्चाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत. या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथून स्लो लोकलने चर्चगेटपर्यंत प्रवास केला. ते या मोर्चाच्या दीड तास अगोदरच दाखल झाले आहेत. मोर्चाच्या तयारीची ते आढावा घेणार असल्याचे कळते.
या मोर्चासाठी विरोधी पक्षातील सर्वच नेते उपस्थित राहणार आहे. यामध्ये शरद पवार, रोहित पवार, सहभागी होणार आहे. उध्दव ठाकरे काही वेळात मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील तर काँग्रेस पक्षातर्फे हर्षवर्धन सपकाळ या मोर्चात दिसतील की नाही याची चर्चा सुरू आहे. डाव्या पक्षाचे नेतेही या मोर्चाच सहभागी होणार आहे. मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर पुण्यातून जागरण गोंधळ घालणारे दाखल झाले. संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरुवात झाली आहे.
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेसमोर यावे या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेय. मोर्चा दुपारी १ वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल.
विरोधकांच्या मागण्या काय आहे?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने याविषयीची चर्चा, बैठका आणि पत्रकार परिषद घेऊन वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळावर प्रेंझेटशन केले आहे. त्यात त्यांनी देशातील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील मतदानातील हेराफेरीचा आरोप केला. दरम्यान, या मोर्चाच्या निमित्ताने ४ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिका निवडणुकांच्या अगोदर मतदार याद्या अद्ययावत करा.
मतदार याद्यातील घोळ संपल्याशिवाय, त्या अद्ययावत झाल्याशिवाय पुढील सहा महिन्यापर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नका
मतदार याद्यांमधील दुबार नावं अगोदर हटवा
7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा
असा असेल मोर्चाचा मार्ग
दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.
येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चेकरांना, आंदोलकांना मार्गदर्शन करतील. यात उध्दव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, शेकापचे जयंत पाटील यांसह अन्य नेते मार्गदर्शन करतील.
मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.
या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




