मुंबई | Mumbai
महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीच्या आधी घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ही भेट झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मलिक यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पायउतार करणार असा दावा देखील त्यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करेल, असं मलिकांनी म्हटलं.
तसेच सत्यपाल मलिक यांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. काँग्रेस हरियाणामध्ये जवळपास ६० जागा जिंकेल. तर भाजप केवळ २० जागा जिंकेल. २०१९ च्या पुलवामाच्या हल्ल्यात ४० सीआसपीएफ जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची व्यापक चौकशी व्हावी. मी पुलवामा हल्ल्याच्या चौकशीची मागणी करत आहे. लोकांना कळलं पाहिजे की आपले जवान कसे मारले गेले. जवान शहीद होण्याला कोण जबाबदार आहे? हे लोकांच्या समोर आलं पाहिजे, असाही मलिक म्हणालेत.
जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांच्याकडं भारतातील बडे उद्योगपती अंबानी यांची एक फाईल सहीसाठी आली होती. या फाईलबाबत मलिक यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मलिक म्हणाले, या लोकांनी ठरवलं आहे की शेती संपवायची, सैन्य संपवायचं. सध्या देशात सरकारी एजन्सीजचा गैरवापर सुरू आहे. मी राज्यपाल म्हणून नियुक्ती झालो त्यावेळी दोन फाईल माझ्या समोर आल्या. यामध्ये एक फाईन ही अंबानी यांची होती. त्यात काही चुकीचं नव्हतं म्हणून मी त्यावर कारवाई करण्यास नकार दिला.
त्यावर मला अधिकाऱ्याने सांगितलं की दीडशे कोटी मिळणार आहेत. मी सांगितलं मला काही नकोय. मी असेपर्यंत असं काहीच होणार नाही. मी दिल्लीत सांगितलं की मला असं काही जमणार नाही. तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्या. त्यावर त्यांनी मला सांगितलं की बरोबर आहे, भ्रष्टाचाराबाबत निष्काळजीपणा चालणार नाही. पण त्या दिवसापासून माझ्यासोबत त्या अधिकाऱ्यांची वागणूकच बदलली. माझ्या गावच्या घरी सीबीआयची टीम चौकशीसाठी पाठवली गेली. माझ्या काकांची मुलं घरी होती, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की घरात भूतं आहेत, त्यानंतर हे अधिकारी पळाले, असा किस्साही यावेळी सत्यपाल मलिक यांनी सांगितला.