वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
सौदी अरेबियात (Saudi Arabia) नोकरी (Job Lure) लावून देण्यासह त्यासाठी लागणारा व्हिसा, पासपोर्ट बनवून देण्याचे आमिष दाखवून खंडाळा (Khandala) येथील काही बेरोजगार तरुणांची फसवणूक (Fraud) करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सैय्यद वाजीद सैय्यद अली (रा.शिऊर ता.वैजापूर हल्ली मुक्काम राजापूर) यांच्या विरुद्ध वैजापूर (Vaijapur) व शिऊर पोलीसांकडे तक्रार करण्यात आली आहे. खंडाळा येथील तरुण हे चांगल्या नोकरीच्या शोधात होते. त्याचा फायदा घेत वाजिद अली सय्यद अली यांनी तुम्हाला सौदी अरेबियात नोकरीला जाऊन देतो माझा व्यवसाय असून मी या आधी अनेक मुले नोकरीला लावलेले आहेत असे म्हणुन त्याने बेरोजगारांना देश-विदेशात नोकरी लावून देण्यासोबतच त्यांचे पासपोर्ट व व्हिसा बनविण्यास आपण मदत करत असल्याचे सांगितले.
त्यामुळे खंडाळा येथील तरुणांनी व त्याच्या काही मित्रांनी वाजिद अली सय्यद अली यांच्यावर विश्वास दाखविला. आरोपीने स्वत:ची ओळख व्हिसा एजंट (Visa Agent) म्हणून देखील करून दिली.आरोपीने खंडाळा येथील तरुण व अन्य काही जणांकडून पैसे घेतले व त्यांना मेडिकल व व्हिसा बनविण्यासाठी दिल्लीला बोलविले. मात्र तो तेथून फरार झाला. तरुण दहा दिवस दिल्लीत राहीले. त्यामुळे निराश होऊन मुले माघारी परतले फसवणूक झालेल्या तरुणांमध्ये खंडाळा, सवंदगाव, वैजापूरसह जिल्ह्यातील 47 तरुण असून यांची प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.