नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील सौंदाळा येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे घरफोडी करून अज्ञात चोरट्यानी एक लाख वीस हजाराची चोरी केल्याची घटना दि.5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी कारभारी आरगडे (वय 59) रा. सौंदाळा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,5 ऑगस्ट रोजी मी माझ्या मुलीस औषधोपचारासाठी नगर येथे रुग्णालयात घेवून गेलो होतो. तिथे डॉक्टरांनी मुलीस अॅडमीट केल्यामुळे आम्ही सर्व जणनगर येथेच होतो. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास मला माझा भाऊ हरीभाऊ कारभारी आरगडे यांचा फोन आला की तुमच्या बंद घराचे मागील बाजूचा दरवाजा तोडलेला दिसत आहे. त्यानंतर त्यांनी आतमध्ये जावून पाहीले असता शोकेसचा दरवाजा तोडुन सामानाची उचकापाचक केलेली दिसले बाबत मला सांगीतले.
त्यानंतर मी माझे राहते घरी सौंदाळा येथे आल्यानंतर घरातील 60 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, साडेचार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपये रोख रक्कम व 20 हजार रुपये किमतीचे दोन डिजीटल घड्याळ असा 1 लाख 20 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानतर माझे घराचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहीले असता त्यामध्ये तिन चोरटे 9 ऑगस्ट रोजी रात्री 2:30 वाजेचे सुमारास घरफोडी करून चोरी करताना दिसत आहेत. या फिर्यादी वरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.