नाशिक | प्रतिनिधी Nashik
येत्या रविवारी नाशिकची सांस्कृतिक ओळख असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक( Sarvajanik Vachanalaya Nashik ) या संस्थेची निवडणूक ( Elections ) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी ग्रथालय ग्रंथमित्र पॅनलचे ( Granthmitra Panel )अध्यक्षपदाचे उमेदवार वसंतराव खैरनार ( Vasantrao Khairnar ) यांच्याशी संवाद साधला.
माणसातील माणूस घडविण्यासाठी सार्वजनिक वाचनालयाचे योगदान मोठे आहे, असे मत ग्रंथमित्र पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार वसंतराव खैरनार यांनी व्यक्त केले.
सावना विषयी माहिती देताना ते म्हणाले, एका इंग्रज अधिकार्याने या ग्रंथालयाची स्थापना केली. तेव्हा मुंबइ, कलकत्त्यानंतर हे भारतातील तिसरे ग्रंथालय होते. या ग्रंथालयाला आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती जसे की, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, यांनी भेटी दिल्या. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वाचनालयाला जागा मिळाली आणि त्याचा विकास सुरु झाला.
निवडणुकीबाबत बोलताना खैरनार म्हणाले, आपण लोकशाही मानतो तेव्हा काही गोष्टी अध्याहृत आहेत. नियम कायदे सर्वस्वी असतात. इतिहासाचा परिणाम वर्तमानावर होत असतो त्यामुळे अनेक निवडणुकींचा परिणाम कळत न कळत आपल्यावर होतो. निवडणुकीत असलेले अलिखित संकेत हे अधिकाधिक पद्धतीने पाळले गेले पाहिजेत. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या सर्वच सूचनांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. एखादा टक्का संकेत डावलले जातात…शेवटी माणसेच आहेत ती, चूका सुधारणा होत राहतात.
वाचनालयात ग्रंथालय शास्त्राचे मूळ म्हणजे त्यातील पुस्तकाला वाचक तसेच प्रत्येक वाचकाला पुस्तक मिळायला हवे. हा जगात रूढ झालेला ग्रंथालयशास्त्राचा संकेत पाळला जावा. तसेच वाचकाला कमीत कमी वेळेत पुस्तक उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने सार्वजनिक वाचनालयाची कार्यपद्धती असायला हवी.
वाचनालयाच्या पुस्तक देव घेव विभागात रोज साडेतीनशे ते चारशे वाचक ये जा करत असतात, साधारणपणे अडीच हजार वाचक पुस्तके वाचत असतात. वाचक सभासद असायला हवेत यासाठी नियमावली देखील तयार व्हायला पाहिजे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवीन सभासद झाले आहेत. मात्र, यापुढे सभासद होताना त्यांना नियम घालून दिले जातील; आम्ही निवडून आल्यावर हे काम करू असे अभिवचन देतो. वाचनालयाच्या विकासाबाबत ते म्हणाले, काही तांत्रिक कारणांनी अर्धवट राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. आम्ही तारखेनुसार नियोजन करून जाहीरनामा तयार केला आहे. नुसती आश्वासने देण्यापेक्षा कृतीवर भर दिला आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून मी कार्यकारिणीवर वेगवेगळ्या विभागांवर कामे केली आहेत. या विभागात चांगले वाईट गुण आहेत त्याची मला माहिती आहे. चांगले गुण वाढवता कसे येतील आणि उणीवा कशा कमी करता येईल याबाबत माझ्या टीमला सोबत घेऊन पुढे नेता येईल. माझ्या सुदैवाने गेल्या पन्नास वर्षात मी या पुस्तकांच्या व्यवसाय आणि व्यवहारात मी आहे. यात लेखक तुमच्या भेटीला या कार्याक्रमाचा समावेश करता येईल. आतापर्यंत आलेल्या अनुभवाचे संचित वापरून सावानाला आणखी उंचीवर नेण्यास प्रयत्नशील राहील, असे मी अभिवचन देतो.