मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होण्याचे भीषण सामाजिक परिणाम हळूहळू समाजाच्या अनुभवास येत आहेत. औरंगाबाद येथे काही समाजांचे वधूवर मेळावे नुकतेच पार पडले. मेळाव्याला उपस्थित मुलांची संख्या जास्त आणि त्या तुलनेत मुलींची संख्या खुपच कमी असा सर्वच आयोजकांचा अनुभव होता. याविषयीचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. या मेळाव्यांना साधारणत: अकराशे मुले आणि फक्त चारशे मुली उपस्थित होत्या. ही परिस्थिती ‘सावध ऐका पुढल्या हाका’ अशी आहे. विवाह जमत नसल्याने तरुणांना नैराश्य येत असल्याचे मानसतज्ञांचे निरीक्षण आहे. या समस्येवर व्यवहार्य तोडगे काढले जायला हवेत. ते तसे न काढले गेल्यास अजून काही वर्षांनी समाजाला भोगाव्या लागणार्या परिणामांचा विचार करताना संवेदनशील माणसांच्या अंगावर काटा उभा राहील. विवाहयोग्य मुलांना विवाहासाठी मुली का मिळत नाहीत याचा एकांगी दृष्टीकोनातून विचार करता येणार नाही. या समस्येकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहिले जायला हवे. मुलींचा जन्म अजुनही नाकारला जातो. गर्भलिंग चाचणीवर कायद्याने बंदी आहे. कायद्याला बगल देणार्यांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न सरकारही करते. पण कायद्याला बगल देण्याचे विविध मार्ग लोक शोधून काढतात. परराज्यात जाऊन गर्भलिंग चाचणी करुन घेतात. मुलगी नकोच या भावनेची दहशत कधी इतकी असते की, जन्माला आलेल्या पोटच्या गोळ्याला आईच कचर्याच्या ढिगार्यात फेकून द्यायला प्रवृत्त होते. बेकायदा पद्धतीने गर्भलिंग चाचणीही ती करु देते. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. मुलींची सुरक्षितता ही गंभीर समस्या आहे. शिवाय मुलीला हुंडा द्यावा लागतो. लग्नानंतरही अनेक खर्च परंपरा म्हणून करावे लागतात. याउलट मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी हा समज पक्का आहे. त्यामुळेही मुलगी नकोशी असावी का? अर्थात याचा सगळा दोष पुरुषांनाच देता येणार नाही. पोटी मुलगी जन्माला यावी अशी अनेक आयांची देखील इच्छा नसते हे वास्तव आहे. याच मनोवृत्तीचे दीर्घकालीन परिणाम समोर येत आहेत. मुलगा आणि सुनेची भूमिका परंपरेने ठरलेली आहे. मुलाकडून आणि सुनेकडून असलेल्या पालकांच्या अपेक्षांमध्ये महद्अंतर आढळते. या पारंपरिक भुमिकांवर विशेषत: विवाहयोग्य मुलांचे पालक आजही ठाम आहेत. शिक्षणामुळे मुलींची समज देखील बदलते याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. मुलगी शिकलेली व नोकरी करणारी पाहिजे पण तिने परंपरेने ठरवलेली तिची भूमिका खाली मान घालून पार पाडली पाहिजे अशाच मुलांच्या पालकांच्या अपेक्षा असतात. प्रसंगोत्पात त्या व्यक्तही केल्या जातात. तथापि वाढत्या शिक्षणामुळे मुलींची मानसिकता मात्र वेगाने बदलते. काळ बदलतो. त्याप्रमाणे मुलामुलींच्या भूमिका देखील बदलत आहेत. मुली स्पष्टपणे व्यक्त व्हायला लागल्या आहेत. तथापि मुलींच्या अपेक्षा वास्तवाला धरुन नसतात असा मुलांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आक्षेप असतो. विवाहयोग्य मुलांचा विवाह न जमण्याची शोधली तर अशी अनेक कारणे आढळतात. परिस्थिती बदलायला हवी यावर संबंधित सर्वच घटकांचे एकमत असणार. तथापि वास्तव स्वीकारले जाईल का हा कळीचा मुद्दा आहे. समाजधुरिणांनी या समस्येवरचे व्यवहार्य उपाय सुचवायला हवेत.