अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-मनमाड महामार्गावरील अॅपेक्स हॉस्पिटलच्या बेसमेंट मधील भागात मंगळवारी दुपारी आग लागली होती. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर अनेक रुग्ण उपचार घेत असल्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये काही बॉक्सचे पुठ्ठे, फायली, केस पेपर आदी सामान ठेवलेले होते. साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास बेसमेंटमधून धूर येताना दिसला. तेथील कर्मचार्यांनी जाऊन पाहणी केली असता बेसमेंटमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून तात्काळ आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आग लागलेली असताना तळमजल्यावर काही रुग्णांवर उपचार सुरू होते. रुग्णालयात धुराचे लोट पसरल्याने आग विझवताना कर्मचार्यांना अडचणी येत होत्या. रुग्ण व नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यातच आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच जनरेटर व ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आलेले होते. सुदैवाने तिथपर्यंत आगीची झळ न पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याची नोंद नाही.