चोरट्यांचा धुमाकूळ । दोन ठिकाणी घरफोड्या
अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी उपनगरात बंद घरांना टार्गेट करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील दोन घरफोड्यात चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यातील प्रतिभा विजयकुमार पेंडसे यांच्या घरातून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा 5 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. प्रतिभा पेंडसे यांचा मुलगा पवन हे पुण्यात व्यावसायानिमित्त स्थायिक आहेत. 21 तारखेला त्यांचा वाढदिवस आसल्याने आई-वडील दोघेही पुण्यात गेले होते.
चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसरी घटना बालिकाश्रम रस्त्यावरील गीते हॉस्पिटल जवळच्या ऑरचीड आपर्टमेंटमध्ये घडली. दत्तात्रय चंद्रकांत अंदुरे यांच्या घरातून रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा 28 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 17 ते 23 तारखेदरम्यान ही चोरी झाली. अंदुरे या वैद्यकीय व्यावसाय करतात. चोरट्यांनी कॅमेरा, रोकड आणि सोन्याचा ऐवज असा ऐवज लंपास केला.
केडगावातही चोर्या
केडगावातही चोेरट्यांनी ‘डाव’ साधत दोन ठिकाणी चोर्या केल्या. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांच्या भूषणनगरमधील घरातून 10 हजार रुपयांचे घड्याळ आणि अडीच हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. लिंकरोडवरील नाझरीन चर्चच्या पाठीमागे राहणार्या मार्विन चार्लल्स माकवान यांच्या घरातही चोरी झाली. काल रात्री चोरट्यांनी घरफोडी करत सहाशे रुपयांची रोकड लंपास केली.