Monday, May 27, 2024
Homeनगरसावेडी, केडगावात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

सावेडी, केडगावात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात सोनसाखळी चोरट्यांनी बुधवारी धुमाकूळ घातला. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी सावेडी व केडगाव उपनगरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांचे दागिने चोरले. मध्यंतरी बंद असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन चोरण्यात आली. सावेडीतील मिस्कीन मळ्यात बुधवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. शांतीदेवी घनश्याम झालानी (वय 78, रा. झालानी हॉस्पिटलजवळ, मिस्कीनमळा, सावेडी) या सकाळी 11 वाजता धुतलेले कपडे बाहेर टाकत होत्या. त्यावेळेस दुचाकीवर आलेल्या दोघांनी राहुलचा बंगला कोठे आहे? असा पत्ता विचारण्याचा बहाणा केला. शांतीदेवी या पत्ता सांगत असताना दुचाकीवरील मागे बसलेल्या चोरट्याने गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन चोरली. झालानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव उपनगरातील मंजुषा उमाकांत अनगळ (वय 55 रा. ताराबाग कॉलनी, केडगाव) या बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरासमोर आलेल्या केळीवाल्याशी बंद गेटच्या आतून बोलत असताना दुचाकीवरून आलेले दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी एक चिठ्ठी दाखवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. मंजुषा अनगळ या चिठ्ठीवरील पत्ता बघत असताना त्या व्यक्तींनी मंजुषा यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी चोरून धूम ठोकली. यानंतर मंजुषा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे ‘ते’ पथक काय करते?

नगर जिल्ह्यात वाढत्या सोनसाखळी, बॅग लिफ्टिंगच्या घटना रोखण्यासाठी मागील वर्षी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या आदेशानुसार तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक पथक स्थापन केले होते. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेशी (एलसीबी) संलग्न आहे. या पथकाकडून सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. नेमके हे पथक करते तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या