Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedआर.डी.मध्ये घोटाळा ; डाकपालाला सक्तमजुरी

आर.डी.मध्ये घोटाळा ; डाकपालाला सक्तमजुरी

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

पोस्टाच्या आर.डी आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत तीन लाख ११ हजार ५० रुपयांचा अपहार करणाऱ्या हतनुर येथील डाकपालला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी ठोठावली. विनायक शेषराव निकम (३६, रा. नादरपूर ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी तथा डाकपालाचे नाव आहे. विशेष म्हणजे प्रकरणात गुन्हा दाखल होताच आरोपी निकम याने अपहार केलेली रक्कम पोस्ट कार्यालयात जमा केली होती.

- Advertisement -

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय

या प्रकरणात भडकल गेट येथील मुख्य पोस्ट ऑफिसचे तत्कालीन सहायक अधिक्षक हेमंत एकनाथ महाराज खडकेकर (४०) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, फिर्यादी हे १४ जून २०११ पासून मुख्य पोस्ट ऑफीस येथील उत्तर उपविभागात सहायक अधिक्षक म्हणून काम करत होते. उत्तर उपविभागा अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ऑफीसच्या कामावर देखरेख ठेवणे, वार्षिक तपासणी करणे आदी कामे फिर्यादी करत होते. फिर्यादीच्या अधिकार क्षेत्रात कन्नड, वेरुळ, खुलताबाद अशी ११ उप डाकघर, व त्या अंतर्गत ६७ शाखा डाकघर येतात. त्यातील कन्नड उपडाक घर अंतर्गत हतनूर शाखा डाकघर येथे विनायक निकम हे डाकपाल म्हणून १८ जून २००४ ते २४ जून २०१० पर्यंत कार्यरत होते. १८ जून २०१० रोजी प्रवर अधिक्षकांनी हतनूर येथील डाकघराची वार्षिक तपासणी केली. त्यात विनायक निकम याने २३ ऑगस्ट २००५ ते १८ ऑगस्ट २०१० या कालावधीत आर.डी. योजनेतील एक लाख ७३ हजार ३४९ रुपये आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेची एक लाख ३७ हजार ७०१ रुपये असे सुमारे तीन लाख ११ हजार ५० रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीत जमा न करता त्याचा अपहार केल्याचे समोर आले. 

या प्रकरणात कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीला सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी १३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी विनायक निकम याला भादंवि कलम ४०९ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक अशोक तुपे, व्ही.आर. मनवर यांनी दोषारोपपत्र दाखल केले. तर पैरवीसाठी सहायक फौजदार शंकर पवार, माधव हरणे, जमादार सुरेश शिदे, हवालदार सुनिल जोनवाल यांनी सहकार्य केले.

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय

- Advertisment -

ताज्या बातम्या